कराड/प्रतिनिधी : –
गुंफण अकादमीच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा, तसेच सीमा भागात मराठी भाषा व साहित्य वृद्धिंगत करण्यासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आज पुरस्कार वितरण : येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाउन हॉल) आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात शुक्रवार (दि. ९) रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. चेणगे यांना प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. खा. शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्यिक प्रवीण गायकवाड हे संमेलनाचे अध्यक्ष असून स्वागताध्यक्ष सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आहेत.
साहित्य चळवळीत भरीव योगदान : डॉ. बसवेश्वर चेणगे हे तीन दशके गुंफण अकादमीच्या माध्यमातून साहित्य चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत. मराठी भाषा व साहित्य वृद्धिंगत व्हावे, या तळमळीतून महाराष्ट्र, गोवा तसेच सीमा भागात त्यांच्या पुढाकाराने अनेक साहित्य संमेलनांचे आयोजन केले जात आहे. दिवाळी अंक, कथा स्पर्धा, कवी संमेलन, ग्रंथालयांना मदत यासारख्या उपक्रमातून ते माय मराठीची अखंड सेवा करत आले आहेत.
कार्याची दखल : डॉ. चेंणगे यांच्या साहित्य चळवळीतील कार्य व योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन : या पुरस्काराबद्दल साहित्य, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
