सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. सुरेश भोसले; कृष्णा विश्व विद्यापीठात ‘कृष्णा सेवागौरव’ समारंभ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा समूह हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सदस्य सेवानिवृत्त झाले; तरी माजी कर्मचारी व कृष्णा समूहाचा स्नेह कायम आहे. सेवानिवृत्ती ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. कृष्णा ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीनंतरही काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

सेवागौरव समारंभ : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘कृष्णा सेवागौरव सेवानिवृत्ती’ समारंभात ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, सहाय्यक कुलसचिव सौ. अस्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान : यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डॉ. भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कर्मचाऱ्यांचे योगदान : याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, कृष्णा समूहाच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण राहिले आहे. संस्थेचे नाव मोठे होण्यामागे इथल्या कर्मचाऱ्यांचे अपार योगदान आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आज कृष्णा विद्यापीठाला व कृष्णा हॉस्पिटलला देशपातळीवर ओळखले जाते. सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव समाजासाठी वापरावेत आणि सामाजिक कार्यात योगदान द्यावे.

उपस्थिती : मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी प्रास्तविक केले. डॉ. दिपाली जानकर यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक व्यवस्थापक चेतन गोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा विद्यापीठाच्या दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपी अधिष्ठाता डॉ.जी. वरदराजुलू, नर्सिंग अधिष्ठाता डॉ.वैशाली मोहिते, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश पठाडे, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!