श्रीनिवास पाटील; कराडला अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचा शुभारंभ
कराड/प्रतिनिधी : –
राजकारण, समाजकारणातून विकासकारण करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण तितकेच मोठे साहित्यिक होते. आज त्याची कर्मभूमी असलेल्या यशवंतनगरीत होणाऱ्या नवोदित साहित्य संमेलनातून साहित्यिकांना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे धन प्राप्त व्हावे; हीच या संमेलनाची खरी पूर्ती ठरेल, असा विश्वास माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलन : येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या उद्दघाटनप्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, पत्रकार विशाल पाटील, रवींद्र पाटील, हणमंत चिकणे, परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा शुभांगी काळभोर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नितीन काळभोर, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा विचारांची खाण : सातारा जिल्हा ही विचारवंताची खाण आहे, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, महात्मा फुल्यांपासून अनेक विचारवंतांच्या वैचारिक चळवळीचा साक्षीदार म्हणून जिल्ह्याकडे पाहिले जाते. पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी विचारांची एक चळवळ उभी केली. त्या चळवळीचा वारसा आजही येथे जोपसला जातो.
समाजसेवेचा वारसा : जाणता साहित्यिक व उत्कृष्ठ राजकारणी म्हणूनही त्यांचा गौरव आहे. त्यांच्या त्याच विचारांचा वारसा घेवून अनेक संस्था येथे काम करतात. येथे भरलेल्या साहित्य संमेलनातही त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जावा, असे सांगत श्री. पाटील म्हणाले, नवोदित लेखकांनी त्याच विचारांतून अनेक गोष्टी स्विकाराव्यात. तो वारसा समाजसेवेचा आहे, तो अधिक समृद्धपणे समाजासमोर मांडला पाहिजे.
साहित्याची मंदिरे उभारा : अलीकडे वाचन संस्कृती फार कमी झाली आहे. शेतकरी दुध काढताना एक सड वासरासाठी राखून ठेवतो. मात्र, सध्याचे राजकारणी, व्यवहारातले धंदेवाईक इतरांसाठी काहीही न ठेवता सर्वांची पिळवणूक करत आहेत. साहित्य माणसाला मोठे करते, असे सांगत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, हल्ली देवळे जास्त बांधली जात आहे. पण साहित्याची मंदिरे फार कमी उभारली जात आहेत, त्यांची निर्मिती व्हायला हवी. सांगली, सातारा, कोल्हापूरच्या मातीने अनेक साहित्यिक दिले. यशवंतराव चव्हाण साहेब हेही त्यातीलच एक रत्न असल्याचे सांगून त्यांनी अनेक काव्यपंक्तींद्वारे अजरामर साहित्यकृतींना उजाळा दिला.
साहित्यिक आणि पत्रकारांचे नाते : संमेलनाचे उद्दघाटक पत्रकार विशाल पाटील म्हणाले, साहित्यिक आणि पत्रकारांचे जवळचे नाते आहे. पत्रकारिता करताना, समाजातील प्रश्न मांडताना अनेक साहित्यकृती समोर येतात. समाजात अनेक नवोदित साहित्यिक आहेत. शाळेतूनच साहित्यिक घडतात. त्यामुळे साहित्य व शाळेचा संबंध चांगला असतो. नवोदित लेखकांनी आपल्या विचारांना लेखीतून मूर्त रूप द्यावे.
बोचरी बाजूही मांडा : शरद गोरे यांनी प्रास्ताविकात अलीकडचे साहित्यिक आणि राजकारणी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच ज्याप्रमाणे चांगली बाजू मंडळी जाते, त्याप्रमाणे प्रत्येक साहित्यिकाने बोचरी बाजूही मांडायला हवी, असे मत व्यक्त केले. विकास भोसले यांनी परिषदेची भुमिका स्पष्ट केली.
साहित्य दिंडी : प्रारंभी, शिवतीर्थ दत्त चौकातून साहित्य दिंडीस प्रारंभ झाला. येथून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळ ते संमेलन स्थळापर्यंत ही दिंडी काढण्यात आली.
पुरस्कार्थींचा सन्मान
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सीए. दिलीप गुरव (कराड), पत्रकार विशाल पाटील (मुंबई), सौ. वैशाली प्रशांत भोसले (कराड), हेमंत तुपे, दत्तात्रय खरात (कराड), शंभूदादा पवार, बसवेश्वर चेणगे (मसूर), हणमंतराव कदम-इनामदार (कराड), सौ. विजयाताई पाटील (कराड), सौ. स्वाती पिसाळ (कराड), जयवंत विठ्ठल क्षीरसागर-पाटील, श्रीमती रत्नाबाई सोळसकर, सिद्धार्थ झपके, प्रकाश औताडे, डॉ. बाळासाहेब मस्के, डॉ. प्रशांत तेलगट, डॉ. सुरेखा लहाने, डॉ. देवेश पाथ्रीकर, विक्रम शिंदे, किशोर टिळेकर, हर्षल बागल, ॲड. प्रशांत चौधरी, ज्ञानेश्वर पतंगे, श्रीमती समर सुलताना यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच रवींद्र पाटील, डॉ. राजश्री बोहरा, डॉ. अलका नाईक, हिरामण सोनवणे, ज्ञानेश्वर धायरीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
