पेढे वाटून व फटाके वाजवून नागरिकांकडून आनंदोत्सव
कराड/प्रतिनिधी : –
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उध्वस्त केले आहेत. भारताच्या या ऑपरेशन “सिंदूर”नंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. त्यानुसार कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात विविध सोशल मिडिया, सामाजिक संघटना, विविध संस्था, श्री शिवप्रतिष्ठान व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला आहे.
आतंकवादी हल्ल्याचा बदला : काही दिवसांपूर्वी पेहेलगाम (कश्मीर) येथे अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये अनेक नागरिक, पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युउत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून बदला घेत अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या हल्ल्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात जल्लोष व्यक्त करण्यात आला.
घोषणाबाजी : त्यानुसार कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात भारत माता की जय, वंदे मातरम् , छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जला दो जला दो, पाकिस्तान जला दो’ आदी घोषणाबाजी करत अनेक सोशल मिडिया ग्रुप्स, सामाजिक संघटना, विविध संस्था, श्री शिवप्रतिष्ठान व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच पेढे वाटप करून जल्लोष साजरा केला.
भारत शांतता प्रिय देश : भारताच्या या ऑपरेशन ‘सिंदूर’बाबत बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, भारत हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अत्यंत शांतता प्रिय देश आहे. भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला करण्याचे काम केले नाही. परंतु, ज्या ज्या वेळी भारताच्या भूमीवर अतिरेक्यांनी हल्ला केला, त्या त्या वेळी भारताने त्याचे चोख व सडेतोड प्रत्युउत्तर दिले आहे.
पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊल : पहलगाम येथे अतिरेक्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय नागरिक पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अत्यंत कठोर पावले उचलून त्यांचे नऊ अतिरेकी अड्डे पूर्णपणे उध्वस्त केले आहेत. त्यामुळे ज्या भारतीय नागरिकांनी जीव गमावले, त्यांच्या आत्म्यांना चिरशांती लाभली असेल, अशी भावना व्यक्त करत भारत सरकार अभिनंदनच पात्र असून या सरकारने पाकिस्तानला चोख प्रत्युउत्तर देण्याचे धारिष्ट दाखवले, त्याबद्दल एक भारतीय नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण सरकारच्या पाठीशी असल्याचेही आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी सांगितले.
