पालिकेने २०३० पर्यंतचा विकास आराखडा तयार करावा – आमदार डॉ. अतुल भोसले
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरामध्ये अस्वच्छता वाढल्याने स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये देशपातळीवर अव्वल ठरलेल्या नगरपालिकेचा स्वच्छतेतील क्रमांक घसरला आहे. आमदार डॉ. अतुल भोसले, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात देशात पुन्हा अव्वल करु, असा एकमुखी निर्धार कराडकरांनी बुधवारी केला.
चर्चासत्र : येथील पालिकेच्या सभागृहात स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती : आमदार डॉ. भोसले, मुख्याधिकारी श्री. व्हटकर, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, लोकशाही आघाडीचे सौरभ पाटील, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, सुहास जगताप, नाना खामकर, एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद, उद्योजक दिपक अरबुणे यांच्यासह माजी नगरसेवक, स्वच्छता दूत, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
एकच सत्ता कायम राहत नाही : याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेसे काम शहरात झाले पाहिजे. पालिकेत एकच सत्ता कायम राहत नाही. त्यामुळे नवीन लोक सत्तेत आल्यावर त्यांच्या पद्धतीने काम सुरु होते. त्यामुळे अगोदर केलेल्या विकासकामांना खो बसतो. त्यासाठी पालिकेने २०३० पर्यंतचा विकासाचा आराखडा आत्ताच तयार केला पाहिजे. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून आवश्यक असलेला निधी आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
नेते ठरवतील तशी भूमिका घ्यावी लागते : स्थानिक राजकारणामध्ये विधानसभेच्या सदस्यांनी किती लक्ष घालावं याची देखील मर्यादा आपण राखणं गरजेचं आहे, असे सांगून आमदार डॉ. भोसले म्हणाले, ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका असतात. त्यावेळी पक्षीय चिंन्हावरच निवडणुकीला सामोरे जावे लागते. नगरपालिकेच्या निवडणुकींनाही पक्षाची ध्येयधोरण असतात. शेवटी आपण महायुतीत काम करतो. नेते मंडळी ठरवतील, तशी भूमिका घ्यायला लागते. त्याबरोबर विरोधी बाजूची लोक जी आहेत त्या लोकांना देखील बरोबर घेण्याची भूमिका ही विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण ठेवली पाहिजे, त्यामुळे शहराचा सर्वसमावेशक विकास होईल.
प्रदूषण विरहित शहर बनवणार : प्रीतिसंगम घाट, कृष्णा-कोयना नद्यांच्या काठी नेकलेस रोड आदींचा विकास करण्यात येणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक ठिकाणे शहर परिसरात आहेत. त्याचाही विकास केला जाईल. कराड शहराला सर्व सोयीनियुक्त प्रदुषण विरहीत शहर बनवायचे आहे. त्यामुळे सर्वांना याच शहरात येवुन रहावे, असे वाटेल असे शहर बनवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी साथ महत्वाची असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.
मान्यवरांचे मनोगत : जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, राहुल खराडे, प्रा. जालिंदर काशीद यांच्यासह नागरिकांनी शहराच्या विकासासाठी नागरिकांनी असलेल्या प्रश्नांवर उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक आशिष रोकडे यांनी, सूत्रसंचालन निवृत्त अभियंता ए. आर. पवार, मुख्याधिकारी व्हटकर यांनी आभार मानले.
