कराड दक्षिणचा जनता दरबार यशस्वी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. अतुल भोसले; अनेक प्रश्न लावले मार्गी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न 

कराड/प्रतिनिधी : – 

सामान्य जनतेचे जीवन सहज व सुलभ होण्यासह त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांनी सहभाग नोंदवून अनेक प्रश्न मार्गी लावले असून हा जनता दरबार यशस्वी झाला असल्याची माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

जनता दरबार : येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जनता दरवाजाचे आयोजन केले होते. त्यानंतर माध्यमांचे त्यांनी संवाद साधला.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नगर अभियंता रत्नरंजन गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद चौधरी, पाटबंधारे विभागाचे श्री. रेड्डीयार यांच्यासह बहुतांशी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

निर्णय घेण्याच्या सूचना : यावेळी नागरिकांनी त्यांच्या विविध मागण्यांची निवेदने आमदार डॉ. भोसले यांच्याकडे दिली. आमदार डॉ. भोसले यांनीही या निवेदनांवर प्रत्येक विभागाशी चर्चा करून त्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्या त्या विभागांना केले. त्यानुसार प्रत्येक निवेदनावर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेत ते प्रश्न मार्गी लावत असल्याचे जाहीर केले.

प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य : आमदार डॉ. भोसले जनता दरबार संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सामान्य लोकांचे जीवन सहज आणि सुलभ होण्याकरीता जनता दरबार संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात आली. ती महाराष्ट्रभर यशस्वी ठरते आहे. त्यानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार घेत आहोत. यामध्ये नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देत आहोत. त्यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, कृषी विभाग, महापारेषण, सहकार आदी विभागांतील जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावले आहे. त्यांना ते ते प्रश्न समाजावून सांगून मार्गी लावण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जुने, प्रलंबीत प्रश्न त्वरित मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकाभिमुख कारभार वाढवा : आमदार भोसले पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकार पोचले पाहिजे, यासाठी प्रत्येक विभागाला सक्त सूचना केल्या आहेत अधिकाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकाभिमुख कारभार वाढावा, यासाठी भाजपच्या सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना जनता दरबार घेऊन लोकांपर्यंत पोहचण्याचे आदेश दिले असून जनता दरबारात थेट प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. येथे तो प्रयोग यशस्वी झाला असून मोठ्या प्रमाणावर लोकं आले होते. त्यांचे अनेक प्रश्न होते, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी ते प्रश्न समजावून घेतले असून आम्ही त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यशस्वी झालो आहोत. तर काही प्रश्नांबाबत बैठका लावण्याचे नियोजन करत आहोत.

विकासाचे कॅलेंडर तयार करून : रस्त्यांवरील अतिक्रमणे, सातबाऱ्यावरील अडचणी असे काही प्रश्न सोडविण्यासाठी नियोजनाच्या बाबतीत विचार सुरू आहे. बऱ्याचशा प्रश्नांना आम्ही योग्य दिशा दिली आहे. काही प्रश्न थेट सोडवले देखील आहेत. वर्षाचे कॅलेंडर आम्ही तयार करून त्या त्या वेळी जनता दरबार घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ठरवत असलेल्या कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यामध्ये दिवस ठरवून आपण जनता दरबार घ्यायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. व्यापारी, सामान्य जनता, उद्योजकांसह विविध क्षेत्राशी निगडित काही प्रश्न आहेत, त्यालाही मार्गी लावणार असल्याचेही आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!