कराडमध्ये शासकीय ध्वजवंदन उत्साहात; सर्वांनी तत्पर राहायला हवे
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त कराड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याहस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार, नायब तहसीलदार युवराज पाटील, कराड तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अपर्णा यादव यांच्यासह तहसील, प्रांत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रध्वजास मानवंदना व सलामी : याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्यानंतर उपस्थित त्यांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतर, तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौतुक सोहळ्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रथमच ध्वजवंदन : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय ध्वजवंदन केले.
वैभवशाली परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी : याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महाराष्ट्र म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता, सामाजिक समतेचा गड आहे. आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्यासारख्या महामानवांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. आज या वैभवशाली परंपरेला पुढे नेण्याची, सुशासन, विकास, आणि सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करण्याची आपल्यावर जबाबदारी असल्याचे सांगितले.
नागरिकांना दिल्या शुभेच्छा : तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून, तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर राहायला हवे. असे सांगून आमदार श्री. भोसले यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
