कराड/प्रतिनिधी : –
श्री शिवाजी फाउंडेशन, मलकापूर (कराड) यांच्यावतीने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दीपस्तंभ गौरव पुरस्कार सन 2025 चे आयोजन करण्यात आले होते. येथील सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री शिवाजी फाउंडेशनतर्फे माजी सैनिक व सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रशांत कदम यांना अन्यावारांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘आदर्श सैनिक’ (फौजी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
१७ वर्षे देशसेवा : प्रशांत कदम यांनी भारतीय सैन्य दलात जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल, हैदराबाद, पुणे अशा अनेक ठिकाणी १७ वर्षे सेवा बजावली.
यशवंत चारिटेबल ट्रस्टची स्थापना : सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रशांत कदम यांनी वडगाव (उंब्रज) येथे यशवंत चारिटेबल ट्रस्टची स्थापना करून या माध्यमातून त्यांनी भारतीय सैन्य, महाराष्ट्र पोलीस, अर्ध सैनिक बल यामध्ये भरती होणाऱ्या तरुण, तरुणींना मार्गदर्शन करत फिजिकल ट्रेनिंग भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत. स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येते.
सैनिक हितासाठी कार्य : सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम सातारा जिल्ह्यात अमृत वीर जवान अभियान व जिल्हा सैनिक संरक्षण समिती राबवून प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून जिल्हा व तालुका स्तरावर सैनिकांच्या समस्यांबाबत बैठकींचे आयोजन करून आजी-माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबीयांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मदत केली आहे. गावोगावी शहीद दिवस साजरा करणे, सैनिक सन्मान रॅली, तिरंगा रॅलीचे आयोजन, सैनिक मिळावे, सैनिक संपर्क अभियान असे अनेक प्रेरणादायी काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सदरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
