आशिष कासोदेकर; कराड रोटरी पुरस्कार सोहळा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
ध्येय निश्चिती केल्यावर थांबू नका. ध्येय गाठण्यासाठी वेळप्रसंगी अवघड वाटा चोखाळा. ध्येय प्राप्त करण्यासाठी वेडे होऊन अथक परिश्रम, मेहनत घ्या, असे आवाहन विश्वविक्रमवीर अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांनी केले.
पुरस्कार गौरव सोहळा : रोटरी क्लब ऑफ कराड आयोजित कराड रोटरी पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊनहॉल) येथे पार पडला. या सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी सहाय्यक प्रांतपाल राजीव रावळ, क्लबचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सचिव आनंदा थोरात, प्रोजेक्ट चेअरमनअभय नांगरे यांची उपस्थिती होती.

पुरस्काराने गौरव : या व्होकेशनल पुरस्कार गौरव समारंभात कराड रोटरी अवॉर्ड पुरस्कारांने उद्योग क्षेत्रात किशोर कुंभार, क्रीडा क्षेत्रातील राजवर्धन पाटील, पर्यावरण क्षेत्रातील इंद्रजीत निकम, सामाजिक कार्य क्षेत्रात शिवाजी डुबल (राजमाची), सामाजिक संस्था क्षेत्रात आपले कराड ग्रुप, अभिनय क्षेत्रातील आदित्य भोसले (गोवारे), कृषी क्षेत्रातील कृष्णतराव गुरव (घारेवाडी), कला क्षेत्रात बाबा पवार (विंग) यांना सन्मानित करण्यात आले. तर विश्वविक्रमवीर अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात आला.
कराडकरांसमोर उलगडला जीवनपट : लंडनमधील 1400 किलोमीटर सायकलिंग स्पर्धा, केरळ ते लडाख दरम्यान 4 हजार किलोमीटरचे लो करून हाय अल्ट्रा रन, सलग 60 दिवसांत 60 मॅरेथॉन करत बनविलेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील सर्वात कठीण असणारी ला अल्ट्रा 555 किलोमीटरची 126 तासात पूर्ण केलेली हिमालयातील मॅरेथॉन, एव्हरेस्ट 60 किलोमीटर मॅरेथॉन अशा आशिष कासोदेकर यांनी पूर्ण केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी, आलेले अनुभव यांसह आपला संपूर्ण जीवनपट कराडकरांसमोर उलगडला.
ईएमआय भरण्यासाठी जन्मलो नाही : कराडकरांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत श्री. कासोदेकर यांनी आपण केवळ ईएमआय भरण्यासाठी जन्मलो नाही. आपण सकाळी उठल्यावर आनंद घेत जगायच की, जीवनातील आनंद सोडून जगायचे? हे ठरविणे आवश्यक असल्याचे सांगत खेळाडूंना अनमोल मार्गदर्शन केले.
कराड रोटरीने एक वेगळा आदर्श निर्माण केला : आता जग बदलले असून आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असे सांगत डॉ. सुभाष एरम म्हणाले, आशिष कासोदेकर यांच्यापासून प्रेरणा घेत ध्येय प्राप्तीसाठी युवा पिढीने स्वतःला झोकून दिले पाहिजे. कराड रोटरी क्लबने सामाजिक कार्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत कौतुक केले.
प्रकल्प व उपक्रमांची माहिती : रामचंद्र लाखोले यांनी कराड रोटरीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्प व उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक अभय नांगरे, मानपत्र वाचन डॉ. भाग्यश्री पाटील, सुत्रसंचलन किरण जाधव, सचिव आनंदा थोरात यांनी आभार मानले.
