अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांची माहिती; संस्थेस ७.७० कोटींचा नक्त नफा
कराड/प्रतिनिधी : –
जनकल्याण पतसंस्था, कराड या संस्थेने आपल्या व्यवसायाचा चढता आलेख कायम ठेवण्यात यश मिळवत दि. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर ९३८ कोटींचा संमिश्र व्यवसाय केला आहे. गतवर्षीच्या तुलनेने एकूण व्यवसायात २५ कोटीने वृद्धी झाली आहे. मार्चअखेर ५५७ कोटींच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या असून ३८१ कोटी इतके कर्ज वितरण केले आहे. संस्थेने विविध बँकामधून २५३ कोटीची सुरक्षित गुंतवणूक केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.
नक्त एन.पी.ए. ३.९६ टक्के : व्यावसायिक तीव्र स्पर्धेतही बाजारपेठेतील सकारात्मक हालचालींचा संस्थेच्या कामकाजात नियोजनबद्ध उपयोग करुन, तसेच प्रभावी कर्ज वसूली या जोरावर संस्थेचा नक्त एन.पी.ए. ३.९६ टक्के इतका आहे. संस्थेस संपलेल्या आर्थिक वर्षात ७.७० कोटींचा नक्त नफा झाला असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
अद्यावत सेवा सुविधा : संस्थेने सभासदांसाठी अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये युटिलिटी पेमेंटस्, फास्टॅग, क्यू.आर.कोड, टॅक्स पेमेंट कलेक्शन, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी, प्रीपेड डेबीट कार्डचा समावेश होतो. या सुविधांचा संस्थेच्या सभासदांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. संस्थेने ग्राहकांसाठी मोबाईल बँकींग सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे अध्यक्ष श्री. देशपांडे यांनी सांगितले.
सभासदांना लाभ : विमा व्यवसायामधील संस्थांबरोबर व्यावसायिक करार करुन जनरल इन्शुरन्स अंतर्गत वाहन, फायर, मरीन, इंडस्ट्रीअल व हेल्थ इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स अंतर्गत टर्म इन्शुरन्सचा संस्था व्यवसाय करत आहे. या व्यवसायांतर्गत असलेल्या योजनांचा संस्थेच्या अनेक सभासदांनी लाभ घेतला असून याबाबत अध्यक्ष श्री. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रोत्साहनपर व्याजदर : संस्थेने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांना सलग १२ वर्षे प्रोत्साहनपर व्याजदरात १ टक्क्यांपर्यंत ८ कोटी इतका रिबेट दिल्याचे सांगत संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अभिजीत चाफेकर म्हणाले, त्याचा नियमित कर्जदारांना निश्चितच लाभ झाला आहे. सन २०२४-२५ या संपलेल्या आर्थिक वर्षात नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांच्या रिबेटची रक्कम लवकरच त्यांच्या सेव्हिंग्ज, चालू खाती जमा होईल. रिबेट देण्याचे संचालक मंडळाचे हे धोरण पुढे ही सातत्याने ठेवले जाईल. २०२५-२६ यावर्षी देखील आपली कर्ज खाती नियमित ठेवून रिबेट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आव्हाने पेलण्यास सक्षम : आर्थिक वर्ष २०२५-२६ हे अजूनही आव्हानात्मक असणार आहे, याची संस्थेच्या संचालक मंडळास जाणीव असून या आव्हानांचा सक्षमपणे सामना करण्यास जनकल्याण पतसंस्था सिद्द असल्याचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर देशपांडे यांनी सांगीतले.
१००० कोटींच्या व्यवसायाचे उदिष्ट : मागील वर्षात संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याबद्दल व संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सभासदांचे अध्यक्षांनी आभार मानले. चालू आर्थिक वर्षासाठी संस्थेने १००० कोटी व्यवसायाचे उदिष्ट ठेवले असून ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व सभासदांनी संस्थेशी जास्तीत जास्त व्यवहार करुन संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्ष श्री. देशपांडे त्यांनी केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर, संचालक डॉ. प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे, सीए शिरीष गोडबोले, एकनाथ फिरंगे, जितेंद्र शहा, हिंदुराव डुबल, मोहन सर्वगोड, डॉ. सुचिता हुद्देदार, सौ. वर्षा कुलकर्णी, दिपक जोशी, प्रविण देशपांडे, सुनील कुलकर्णी, सीए. आशुतोष गोडबोले, अशोक आटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके उपस्थित होते.
