डॉ. रुपा रावत-सिंघवी; ‘कृष्णा’ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा
कराड/प्रतिनिधी : –
नर्सिंग हे एक ग्लोबल प्रोफेशन आहे. नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असण्याचा अभिमान बाळगावा. तसेच बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धीमत्तेचा (ए.आय.) जरुर वापर करा; पण मानवी बुद्धीमत्तेला दुर्लक्षित करु नका, असे आवाहन नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या जयप्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटरच्या डॉ. रुपा रावत-सिंघवी यांनी केले.
शपथग्रहण सोहळा : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नर्सिंग अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी नर्सिंगच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती : व्यासपीठावर सौ. उत्तरा भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर आर. जी. नानिवडेकर, चीफ नर्सिंग ऑफिसर सौ. रोहिणी बाबर, नर्सिंग विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. वैशाली मोहिते आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नर्सिंग एक कला : नर्सिंग सेवा हे महत्वाचे कार्य आहे. आज संपूर्ण जगाला नर्सिंग सेवेची गरज भासत आहे. नर्सिंग जसे शास्त्र आहे, तसे ती एक कला आहे, असे सांगताना डॉ. रुपा रावत–सिंघवी म्हणाल्या, आज केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रात नर्सिंग स्टाफची गरज आहे. त्यामुळे निर्संगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून, संधींचा शोध घ्यावा.
अभिमानास्पद बाब : अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, नर्सिंग प्रोफेशन हे एक नोबेल प्रोफेशन आहे. फक्त रुग्णांनाच नाही, तर संपूर्ण समाजाला सेवा देण्याचे काम या क्षेत्रात होते. नर्सिंग स्टाफच्या सेवेवरुन एखाद्या हॉस्पिटलचा दर्जा ठरत आहे, एवढे महत्व या क्षेत्राला प्राप्त झाले आहे. भारतीय नर्सेसना जगभर मागणी असून, कृष्णा विश्व विद्यापीठात शिकलेल्या अनेक नर्सेस आज जगभर काम करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.
गुणवंतांचा गौरव : याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
अहवाल वाचन : प्रा. डॉ. वैशाली मोहिते यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. ऋतुजा आवटे यांनी आभार मानले.
उपस्थिती : कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते ॲड. बी. डी. पाटील, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, प्राचार्य सौ. शुभांगी पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
