कृष्णामाई यात्रा उत्सवास उद्यापासून सुरुवात 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बुधवारी मुख्य दिवस; कराडमध्ये सहा दिवस पूजाअर्चा व विविध कार्यक्रम 

कराड/प्रतिनिधी : – 

कराडनगरीचे ग्रामदैवत श्री कृष्णामाई देवीचा चैत्री यात्रा महोत्सव आज शनिवारपासून (दि. १२) सुरू होणार असून सलग सहा दिवस चालणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी (दि. १६) रोजी असून, यात्रेच्या सहा दिवसांत नित्याने पूजाअर्चा, विधी, तसेच धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे.

‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक : हनुमान जयंतीला आज शनिवारी (दि. १२) सायंकाळी श्री. आवटे पुजारी यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक कृष्णा घाटावरील मंडपापर्यंत काढण्यात येईल. तेथे ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना होईल.

‘नवचंडी याग’ : सहा दिवसीय कृष्णामाई यात्रा महोत्सवात रविवारी (दि. १३) रोजी मंगलप्रभात समयी श्री व सौ. अच्युतराव दत्तात्रय कुलकर्णी (मंद्रूळकर) यांच्या हस्ते ‘नवचंडी याग’ संपन्न होईल. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत भजन, सायंकाळी सात वाजता ‘एसओएस’ म्युझिक बॅण्ड, पुणे यांचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हळदी कुंकू : सोमवारी (दि. १४) रोजी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत भजन, सायंकाळी आलापिनी जोशी यांचा स्वरनिर्झर संगीत अकादमी प्रस्तुत बहारदार ‘भावरंग’ कार्यक्रम. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत भजन, हळदी कुंकू, रात्री सव्वासात पासून ‘द म्युझिकल हिट्स’ हा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

नियोजन व सोई सुविधा : बुधवारी (दि. १६) रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुपारी तीन ते पाच भजन होणार असून, दिवसभर यात्रेनिमित्त ग्रामदेवता कृष्णामाईच्या दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी लोटणार असल्याने भाविकांना कृष्णामाईच्या दर्शनाचे नियोजन, तसेच आवश्यक सुविधांची सोय यात्रा उत्सव कमिटीने केली आहे.

नगरप्रदक्षिणा : गुरुवारी (दि. १७) सकाळी भवानी तांडव यांच्या ढोल ताशांच्या गजरात कृष्णामाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा होणार आहे. ही मिरवणूक मंडपात आल्यानंतर सायंकाळी लळीत कीर्तन, वसंतपूजा व रात्री येसूबाईच्या यात्रेने कराडकरांची कृष्णामाई यात्रा महोत्सवाची सांगता होईल.

महाप्रसाद : यात्रेदरम्यान, जुने कृष्णामाई सांस्कृतिक केंद्रात महाप्रसाद, तर कृष्णा घाटावरील मंडपात बुंदी वाटप असेल.

आवाहन : तरी, भाविकांनी यात्रेतील कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णामाई उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद पालकर यांनी केले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!