पारंपरिक शिवजयंती उत्सवाचे कराडमध्ये आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

‘हिंदु एकता’च्या शिवजयंतीचे ५५ वे वर्ष; २८ ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम 

कराड/प्रतिनिधी : –

हिंदु एकता आंदोलन, कराड यांच्यातर्फे दरवर्षी शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी या उत्सवाचे ५५ वे वर्ष असून या उत्सवात भव्य दरबार मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्सव २०२५ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकता आंदोलनचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर यांनी दिली.

पत्रकार परिषद : शिवजयंती उत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राहुल यादव, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थित होते.

हिंदु सारे एक होऊ : ‘वर्ण जात विसरून जावू, हिंदु सारे एक होऊ’ यानुसार हिंदु एकता आंदोलन, कराडच्या वतीने शिवजयंती साजरी केली जात असल्याचे सांगत श्री. पावसकर म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, समस्त हिंदुंचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव २८ ते ३० एप्रिल या कालावधीत कराड परिसरात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

शिवमूर्ती प्रतिष्ठापना : सोमवार (दि. २८) रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील चावडी चौकात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

गावोगावी मूर्ती प्रतिष्ठापना : मंगळवार (दि. २९) रोजी सकाळी ८ वाजता कराड शहर, तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवजयंती मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून तालुक्यात काही गावांमध्ये शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येणार आहेत.

ऐतिहासिक दरबार मिरवणूक : बुधवार (दि. ३०) रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील पांढरीचा मारुती मंदिर, मंगळवार पेठ येथून शिवजयंतीच्या ऐतिहासिक दरबार मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

पारंपरिक साज : या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे भगवा ध्वज, शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशातील घोडेस्वार, शस्त्र पथक, चित्ररथ, वारकरी, ढोलताशा व झांजपथक आदी पारंपरिक पद्धतीचा साज या मिरवणुकीत पाहायला मिळणार आहे.

१५५ गावांत भगवा ध्वज : हिंदू एकताच्या शिवजयंती उत्सवाच्या ५५ व्या वर्षानिमित्त तालुक्यातील १५५ गावांत भगवा ध्वज उभारण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे सांगत संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे म्हणाले, त्यानुसार १४० ध्वज उभारले असून शिवजयंतीपूर्वी अन्य ठिकाणाचे ध्वज उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार पुरस्कारांची घोषणा : हिंदु धर्मासाठी कार्य करणाऱ्यांसाठी यावर्षीपासून हिंदु एकता आंदोलनतर्फे हिंदु योद्धा, प्रचारक, संघटक आणि रणरागिणी असे चार पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप असून लवकरच पुरस्कार निवडीची आणि शिवजयंती उत्सवातील अन्य कार्यक्रमांची माहिती देण्यात येईल. तसेच दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट चित्ररथ, पारंपारिक वेशभूषा आदींचे अनुक्रमे तीन विजेते निवडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपस्थिती : यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव पिसाळ, कराड दक्षिण अध्यक्ष दिग्विजय मोरे, कराड उत्तर अध्यक्ष रोहित माने, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सातारा जिल्हा गोरक्षण सेनेचे अध्यक्ष महेश जाधव, कार्याध्यक्ष प्रमोद डिस्ले, जिल्हा संघटक अजय पावसकर, सातारा तालुकाध्यक्ष ओंकार यादव, तुषार चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!