चेअरमन बाळासाहेब पाटील यांची माहिती; १ कोटी २२ लाखांचा निव्वळ नफा
कराड/प्रतिनिधी : –
कृष्णा-कोयना नागरी सहकारी पतसंस्था मर्या; कराड या संस्थेची मार्च 2025 अखेर 200 कोटींची व्यवसायपूर्ती झाली आहे. संस्थेने या आर्थिक वर्षामध्ये सर्व आर्थिक आलेख कायमचे चढते राखण्यात यश मिळवले असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दहा शाखांमधून सेवा : संस्थेच्या यशाची माहिती देताना चेअरमन श्री. पाटील म्हणाले, कृष्णा-कोयना पतसंस्थेच्या सध्या 9 शाखा व 1 मुख्य कार्यालय कार्यरत आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 113 कोटी 6 लाख, एकूण कर्जे 84 कोटी 84 लाख व गुंतवणूक 44 कोटी 6 लाख असून खेळते भांडवल 136 कोटी 44 लाख आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आवश्यक त्या तरतुदी करून निव्वळ नफा 1 कोटी 22 लाख इतका झाला आहे. एकूण स्वनिधी 17 कोटी 89 लाख आहे.
स्थापनेपासून “अ” वर्ग : संस्था स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग “अ” मिळवून सभासदांना सातत्याने लाभांश वाटप करत आहे.
अत्याधुनिक बँकिंग सुविधा : संस्थेच्या अद्यावत स्व:मालकीच्या तीन इमारती असून संस्थेच्या सर्व शाखांचे कामकाज स्व:मालकीच्या डाटा सेंटरद्वारे कोअर बँकिंग प्रणालीमध्ये चालू आहे. तसेच एनइएफटी/ आरटीजीएस बिल पेमेंट आदी बँकिंग सुविधा सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहेत. संस्थेने योग्य ध्येय-धोरण राबवल्यामुळे संस्थेच्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. तसेच संस्थेने चालू आर्थिक वर्षामध्ये 250 कोटींच्या व्यवसायपूर्तीचे उद्दिष्टे ठेवले आहे.
कौतुकास्पद कामगिरी : संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे कुटुंबप्रमुख महाव्यवस्थापक अरुण पाटील (आप्पा), व्हाईस चेअरमन व सवासंचालक, शाखा सल्लागार, सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक, सर्व अधिकारी, शाखा प्रमुख व सेवक यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या सर्वांचे संस्थेच्या वतीने चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कौतुक करून आभार मानले.
