आशिष कासोदेकरांचा विशेष गौरव; कराड रोटरी अवॉर्ड सोहळ्याचे शनिवारी आयोजन
कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब कराड आयोजित कराड रोटरी अवॉर्ड निमित्त शनिवार (दि. 12) रोजी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या सोहळ्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फेम, आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर हे आपल्या धावपटू जीवनाचा प्रवास उलगडणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ कराड अध्यक्ष रामचंद्र लाखोले व सचिव आनंदा थोरात यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनरचा सन्मान : रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कराड रोटरी अवॉर्ड आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा विशेष सन्मान होणार आहे.
सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन : या प्रेरणादायी व्होकेशनल अवॉर्ड गौरव समारंभात आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा गौरव झाल्यानंतर मराठी माणसाची आंतरराष्ट्रीय धाव समजून घेता येणार आहे. मॅरेथॉनमध्ये त्यांची विशेष कामगिरी आहे. सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन – गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लडाख ५५५ किमी – ५ दिवसांत, ब्राझील २१७ किमी – ४४ तासांत, केरळ ते लडाख – ४००५ किमी (७६ दिवसांत), माउंट एव्हरेस्ट ६० किमी मॅरेथॉन अशा अनेक थक्क करणाऱ्या कामगिरीचा साक्षात प्रेरणादायी प्रवास ऐकता येणार आहे.
रोटरी अवॉर्ड वितरण : या कार्यक्रमात कराड रोटरी अवॉर्ड पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रात किशोर कुंभार, क्रीडा क्षेत्रातील राजवर्धन पाटील, पर्यावरण क्षेत्रातील इंद्रजीत निकम, सामाजिक कार्य क्षेत्रात शिवाजी डुबल (राजमाची), सामाजिक संस्था क्षेत्रात आपले कराड ग्रुप, अभिनय क्षेत्रातील आदित्य भोसले (गोवारे), कृषी क्षेत्रातील कृष्णतराव गुरव (घारेवाडी), कला क्षेत्रात बाबा पवार (विंग) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
आवाहन : या सन्मान सोहळ्यास सर्वांनी आणि विशेषतः खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या वतीने व्होकेशनल डायरेक्टर अभय नांगरे यांनी केले आहे.
