
शांततेत 99 केंद्रावर मतदान प्रक्रिया, आज 8 वाजता मतमोजणीस होणार प्रारंभ
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार (दि. 5) रोजी सरासरी 80.98 टक्के मतदान झाले. कारखाना कार्यक्षेत्रातील कराडसह कोरेगाव, सातारा, कडेगाव व खटाव या पाच तालुक्यांतील एकूण 99 मतदान केंद्रावर एकूण 32 हजार 202 मतदारांपैकी 26 हजार 98 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
इतिहासात प्रथमच तिरंगी लढत : सह्याद्रि कारखान्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली. यामध्ये प्रामुख्याने माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखालील स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल यांच्यात तिरंगी लढत झाली.

चुरशीने मतदान : निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली होती. अपेक्षेप्रमाणे शनिवारी मतदानही चुरसीने झाले असून आज काय निकाल लागतो, याची सभासद, शेतकर्यांसह नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

मतदानासाठी गर्दी व उत्साह : शनिवारी सकाळी आठ वाजता सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात नागरिकांनी मतदान करण्यास पसंती दिल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले.
उन्हाची तीव्रता : दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने मतदान केंद्रांवर शांतता असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले होते. तर पाच वाजेपर्यंत सरासरी 80.98 टक्के मतदान झाले.

नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क : कराड शहरातील मतदान केंद्रावर सभासदांनी मतदान करण्यासाठी सकाळी रांग लावली होती. सकाळी आठ वाजता माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच कडेगाव मतदान केंद्रावर आमदार मोहनराव कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी अतीत येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांच्या सभासद पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदान केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी मसूर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या समर्थक सभासद, शेतकऱ्यांनीही मतदान केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पुसेसावळी येथे मतदानाचा हक्क बजावला. जेष्ठ मतदारांसह महिला मतदारांचा मतदानासाठी उत्साह असल्याचे दिसून आले.

मतदान केंद्रांना भेटी : पुसेगाव विभागात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. वेणेगाव नांदगाव व अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रांवर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तर आमदार मनोज घोरपडे, तसेच विरोधी पॅनेलचे निवासराव थोरात, धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांनीही ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता संपुर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
उमेदवारांचे नशीब पेटीबंद
सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी तिन्ही पॅनेलचे एकूण ६० उमेदवार, तर ९ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदारांनी आपला मतरुपी कौल दिला असून या सर्व उमेदवारांचे नशीब पेटीबंद झाले आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून त्यांच्यासह मतदारांचे निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ
कराड येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. 5 येथे आज रविवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 50 मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत 51 ते उर्वरीत सर्व मतदान केंद्र याप्रमाणे मतमोजणी होणार आहे.
रात्री उशिरा लागणार निकाल?
सायंकाळी चार वाजेपर्यंत पर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. परंतु, हे मतदान मतपत्रिकेवर होत असल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.
वाढत्या मत टक्क्याचा फायदा-तोटा : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान झाले असून तब्बल 80.98 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मत टक्क्याचा नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
