‘सह्याद्रि’साठी पी. डी. पाटील पॅनेललाच मताधिक्य

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळासाहेब पाटील यांचा विश्वास; खाजगी कारखानदारांकडून होणारी बदनामी सभासद खपवून घेणार नाहीत

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासदांना भेटलो. यावेळी चारही तालुक्यात चांगले वातावरण असल्याचे दिसून आले. सभासदांनीही त्याबाबत विश्वास दिला. त्यामुळे विरोधकांची दोन पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा जास्त मतदान पी. डी. पाटील पॅनेलला होईल, असा विश्वास माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

सांगता सभा : मसूर (ता. कराड) येथे पी. डी. पॅनेलच्या सांगता सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद पंडितराव जगदाळे होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, शहाजी क्षिरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या सौ. संगीता साळुंखे, प्रकाश जाधव, कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील, कॉम्रेड सयाजीराव पाटील, बाळासाहेब जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

…त्यांना नैतिक अधिकार आहे का? : काही खाजगी कारखानदार आपल्या कारखान्यात ऊसाला 2800 ते 2900 रुपये दर देतात. मात्र, तेच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सहकारात आदर्शवत ठरलेल्या आणि 3254 रुपये दर देणाऱ्या सह्याद्रि कारखान्याची निवडणूक लढवत आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित करत बाळासाहेब पाटील म्हणाले, या सगळ्या गोष्टींचा सह्याद्रि’च्या स्वाभिमानी सभासदांनी विचार करावा. त्यांनी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी सह्याद्रिची बदनामी करू नये. स्वाभिमानी सभासद ही बदनामी खपवून घेणार नाहीत, असेही विरोधकांना त्यांनी यावेळी ठणकावले.

आम्ही सत्तेचा उन्माद केला नाही : कारखान्यावर कर्ज आहे म्हणता, मग कर्ज असलेल्या कारखान्याकडे का लक्ष देता? केवळ राजकारण म्हणून चांगले चाललेल्या कारखान्यात निवडणूक लागली आहे. विरोधकांकडून प्रचार करताना अरेरावी व एकेरी उल्लेख केला जातो. मात्र, आम्ही कधीही सत्ता आली म्हणून उन्माद केला नाही, असे सांगता बाळासाहेब पाटील म्हणाले, गेली म्हणून खचून गेलेलो नाही. गेली अनेक वर्षे अनेक वारसनोंदी पूर्ण केल्या आहेत. मात्र, केवळ तांत्रिक अडचणीमुळे काही वारसनोंदी रखडल्यात, त्याही योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पूर्ण करू. कामगारांना समान न्याय देण्याची भूमिका घेऊ. मात्र, तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची अवस्था काय आहे? तेही एकदा सर्वांना सांगा, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना दिले.

‘सह्याद्रि’…प्रेरणा देत राहील : स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या कारखान्यासाठी ‘सह्याद्रि’ हे नाव निश्चित केले होते. चव्हाण साहेबांनी दिलेली नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. उलट ‘सह्याद्रि’ हे नावच नेहमीच प्रेरणा देत राहील, असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

…त्यांनी वेगळी भूमिका घेतली नाही : या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलच्या वतीने 107 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पैकी फक्त 21 अर्ज शिल्लक राहिले. उर्वरित जणांनी मोठ्या मनाने अर्ज माघारी घेत प्रचारात गावोगावी आघाडी घेतली आहे. त्यांनी दुसरे पॅनल किंवा अपक्ष अर्ज ठेवण्याची कोणतीही भूमिका घेतली नाही, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सर्व पक्षीयांचा पाठिंबा : सहकारातील निवडणुकीत गट तट न पाहता लोक एकत्रित असतात. त्याप्रमाणेच या निवडणुकीत सर्व पक्षीयांचा पाठिंबा मिळाला असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

सभासद अहंकार घालवतील : यशवंत विचार जपणारा स्वाभिमानी सभासद संयम राखत तुमचा अहंकार मताच्या रूपाने नक्की घालवेल, असे मत देवराज पाटील यांनी व्यक्त केले.

स्मारक जपण्यासाठी सहकार्य करा : स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक म्हणजेच सह्याद्रि कारखाना होय, ते जपण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन अजितराव पाटील-चिखलीकर यांनी केले.

फसवणूक करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा : अफवा पसरवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन सौ. संगिता साळुंखे यांनी केले.

उपस्थिती : कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश माने यांनी, सुत्रसंचालन रमेश जाधव  यांनी, तर माजी सरपंच प्रकाश माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास कडेगाव, खटाव, सातारा, कराड तालुक्यातील विविध गावचे पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!