कराड/प्रतिनिधी : –
उच्च न्यायालयाने प्रादेशिक सहसंचालकांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवासराव थोरात यांच्या उमेदवारीवर दिलेला अवैधतेचा निकाल कायम राहिला आहे. त्यामुळे निवासराव थोरात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. श्री. थोरात पॅनेल प्रमुख असल्याने हा निर्णय स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्रि स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का मानला जात आहे.
मतदानावर काय परिणाम होणार : दरम्यान, या निकालामुळे सह्याद्रि कारखान्याच्या सभासदांमध्ये चर्चेला उधाण आले असून निवडणुकीत मतदानावर याचा नेमका काय परिणाम होणार, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज ठरवला अवैध : सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवासराव थोरात यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या समोर झालेल्या सुनावणीत अवैध ठरला होता.
प्रादेशिक सहसंचालकांची वैधतेची मोहर : या विरोधात श्री. थोरात यांनी प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. गायकवाड यांनी निवासराव थोरात यांच्यासह नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले होते.
निकालाला आव्हान : प्रादेशिक सहसंचालकांच्या निकालाला आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुरलीधर गायकवाड यांनी निवासराव थोरात यांच्या उमेदवारी अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आले.
अखेर न्यायालयाचा निर्णय विरोधात : बुधवारी न्यायालयाने प्रादेशिक सहसंचालक यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निवासराव थोरात यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवणारा निर्णय कायम राहिला आहे. त्यामुळे श्री. थोरात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येत असून मतपत्रिकेवर त्यांचे नाव राहणार नाही.
सुज्ञ सभासद देणार कौल : दरम्यान, एकंदरीत या नाट्यमय घडामोडींमुळे कारखान्याचे सुज्ञ सभासद मतदानातून नेमका काय निर्णय देणार, कोणाला मतदानरुपी कौल देणार याकडे सर्व सभासद, शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.