कराड प्रतिनिधी : –
‘सह्याद्रि’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काहींनी जाणीवपूर्वक माझा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केल्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांकडे याबाबत दाद मागितली. यात त्यांनी अर्ज वैध ठरवला. परंतु, त्यानंतरही त्यावर हरकत घेतल्याने याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांनी अनेकवेळा याबाबतचा निकाल राखून ठेवला. या प्रक्रियेत माझा उमेदवारी अर्ज वैध किंवा अवैध ठरला, तरीही आपण ही निवडणूक जोमाने लढवणार असून विजय खेचून आणणार असल्याचा विश्वास स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्रि स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख निवासराव थोरात यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषद : या न्यायालयीन लढ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्च्याचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
निर्णयास स्थगिती दिल्याची माहिती : न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय मान्य केला असून साखर सह आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे समजले आहे, असे सांगताना श्री. थोरात म्हणाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, माझ्या उमेदवारी अर्जाबाबत न्यायालयाचा निकाल काहीही येवोत, परंतु, आता मागे हटणार नाही.
निवडणूक जोमाने लढवणार : धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या साथीने ही निवडणूक जोमाने लढवणार असून यामध्ये विजयश्री खेचून आणणार असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.
मतदारांसमोर हकीकत मांडणार : येत्या दोन-तीन दिवसात कारखाना कार्यक्षेत्रात जोमाने प्रचार करणार असल्याचे सांगत श्री. थोरात म्हणाले, मतदारांसमोर सर्व हकीकत मांडणार आहे.
न्यायालयीन लढा सुरूच राहणार : दरम्यान, न्यायालयाने माझ्या उमेदवारी अर्ज अवैध प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ घेवो. परंतु, खचून न जाता धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांना सोबत घेऊन आपण न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले.
सभासदच योग्य न्याय देतील : कारखान्याच्या सभासद, शेतकरी सुज्ञ आहेत. त्यामुळे ते कोणत्याही दबावाला बळी न पडता नाहीत. ते प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय देतील, असा विश्वासही श्री. थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.