कराडमध्ये 118 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार; आरोग्य विभाग, रोटरी व सह्याद्रि’मुळे गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू
कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन, बजाज फायनान्स, आरोग्य विभाग व सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मिशन प्रेरणा अभियानांतर्गत कराडच्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये केवळ 45 दिवसांत 118 गोरगरीब बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. यात एका साडेतीन वर्षाच्या बालकावर कराडमधील पहिलीच कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्याची माहिती डॉ. अमित माने यांनी दिली.
पत्रकार परिषद : येथील सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये मिशन प्रेरणांतर्गत करण्यात आलेल्या शस्त्रक्रीया व उपचारांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनचे डॉ. सुधीन आपटे, उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिता लाळे, हॉस्पिटलचे सचिन कुलकर्णी, संचालक दिलीपभाऊ चव्हाण, अमित चव्हाण, डॉक्टर, कर्मचारी, उपचार घेतलेले बालक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
रोटरीच्या माध्यमातून आधार : रोटरीच्या माध्यमातून समाजातील अनेक विषयांवर काम करण्यात येते. मात्र, शिक्षण व आरोग्यावर विशेष लक्ष गेल्यावर भर असतो, असे सांगताना डॉ. सचिन आपटे म्हणाले, संपुर्ण राज्यात मिशन मुस्कानचे काम करताना शासनाच्या आरोग्य विभागाचे चांगले सहकार्य लाभते. राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत गावोगावी बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. तसेच त्यातील गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचारासाठी सुचवले जाते. त्यामुळे रोटरीच्या माध्यमातून निधी देताना खरोखर जे गरजू आहेत, त्यांच्यापर्यंत मदत पोहचते. या योजनेत उपचार घेऊन बरे झालेल्या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर आपल्याही मनाला समाधान मिळते.
118 कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद : ‘मिशन प्रेरणा’मुळे केवळ 118 बालके नव्हे; तर त्यांच्या 118 कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे, असे सांगत डॉ. सचिन कुलकर्णी म्हणाले, उपचारांची गरज असलेल्या बालकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थीती नाही, अशा बालकावर या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाल्याने त्या कुटुंबास मोठा दिलासा मिळत आहे. योग्य उपचारानंतर त्या बालकांचे आयुष्यही सुसह्य होत आहे. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने सह्याद्री हॉस्पिटल नेहमीच समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तयार असते.
सामाजिक उद्देशाने सह्याद्रि’ची उभारणी : मुळात कराडला सह्याद्रि हॉस्पिटलची उभारणीच सामाजिक उद्देशाने करण्यात आली आहे, असे सांगताना दिलीपभाऊ चव्हाण म्हणाले, पुणे, मुंबईच्या धर्तीवर कराड व आसपासच्या तालुक्यातील रूग्णांना कमी खर्चात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. मोठया उपचारासाठी रूग्णांना पुणे व मुंबईला जावे लागू नये. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये मिळत असलेल्या उपचारामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. मिशन प्रेरणामुळे 118 बालकांना मिळालेल्या मोफत उपचाराने जसे त्या बालकांचे जिवन सुखकर झाले आहे. तसेच्या त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
