कराड/प्रतिनिधी : –
नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या ‘फुले’ या चित्रपटात ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावतील असे दृश्य दाखवण्यात आले आहे. परंतु, महान लोकांच्या आडून आमच्या अस्मितांवर घाव घालू नका. लहान मुलाच्या हातून शेण मारण्याचे दृश्य हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी चित्रपटातून वगळावे. यामुळे जे घडेल त्यांची संपूर्ण जबाबदारी चित्रपट निर्मात्यांना घ्यावी लागेल. त्यामुळे ताबडतोब फुलेंच्या चित्रपटातून हे दृश्य वगळण्यात यावेत, अशी विनंती ब्राह्मण संघटनांच्या वतीने करण्यात आली.
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : बुधवारी याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले.
स्त्री शिक्षणासाठीचा लढा महान : क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले कार्य, स्त्री शिक्षणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी दिलेला लढा महान आहे.
…याचे श्रेय फुले दाम्पत्यालाच : आज आपल्या देशातील मुली त्यांच्यामुळे शिक्षण घेत आहेत, नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करत आहेत, याचं निर्विवाद श्रेय फुले दाम्पत्याला जातं. अशा महान व्यक्तींवर कलाकृती सादर करताना त्यांनी सांगितलेल्या काही बाबींचा देखील विचार केला गेला पाहिजे. त्यावेळी महात्मा फुले यांनी भविष्यात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जातीच्या नावावर लोकांना लढवलं जाईल, हेही सांगितले होते. ही बाब लक्षात घेतली, तर फुले दाम्पत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या येऊ घातलेल्या चित्रपटात काही आक्षेपार्ह आणि ब्राह्मण समाजाच्या अस्मिता दुखावणाऱ्या गोष्टी आहेत. त्या टाळता आल्या असत्या.
खुलासेवार चर्चा व्हावी : आमची दिग्दर्शकांना विनंती आहे की, महान लोकांच्या आडून आमच्या अस्मितांवर घाव घालू नका. तेवढे लहान मुलाच्या हातून शेण मारण्याचे दृश्य चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी चित्रपटातून वगळावे. सदर दृश्याबाबत निर्माता, लेखक, संवाद लेखक, पटकथा लेखक, संपादक व दिग्दर्शक या सर्वांनी सविस्तर खुलासा करताना समस्त ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी, सांस्कृतिक मंत्री, सेन्सॉर बोर्ड सदस्य, यांच्यासमोर सदर चित्रपट ‘फुले’चा खास शो ठेवून समाधानकारक खुलासेवार चर्चा व्हावी, अशीही विनंती यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.