आमची प्रमुख लढत बाळासाहेब पाटलांशीच 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

निवासराव थोरात यांनी दिले थेट आव्हान; सर्व सभासदांच्या न्याय-हक्कासाठी विजयश्री खेचून आणू 

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलो आहे. सह्याद्रि’च्या सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवासराव थोरात यांनी बाळासाहेब पाटील याना खुलं आव्हान प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे.

पृथ्वीराजबाबांचा आशीर्वाद घेऊनच निवडणुकीच्या मैदानात : आमचे नेते, मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमच्यासोबतच असल्याचा दावा श्री. थोरात यांनी केला आहे. सहकारी संस्थेत पक्षीय राजकारण कुणी करू नये. इथे प्रश्न सभासद, शेतकऱ्यांचा असून अन्यायाच्या विरोधात उभा राहण्याची आमची भूमिका आहे. यासाठीच कारखान्यात परिवर्तन आवश्यक आहे. पृथ्वीराजबाबा आमचे नेते आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहण्याची त्यांची भूमिका आहे.

षडयंत्रे करून मला थांबविण्याचा प्रयत्न : माझ्यावर अनेक षडयंत्रे करून मला थांबविण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही सर्व सभासदांच्या न्याय-हक्कासाठी या निवडणुकीत विजयश्री नक्कीच खेचून आणू, असा विश्वासही श्री. थोरात यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या पॅनलशी मुळीच लढाई नाही : सह्याद्रि’च्या सभासदांनी सांगितल्यामुळेच आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. तिसऱ्या पॅनलशी मुळीच नाही, असे श्री. थोरात यांनी स्पष्ट केले.

लोकांनी आमच्यासोबत येऊन लढा उभा केला : आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय. आमच्या पॅनलमध्ये सातत्याने १५-२० वर्षे काम करणारे लोक आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांनी आमच्यासोबत येऊन लढा उभा केला आहे. भिकुनाना किवळकर, चोरेकर, आबासाहेब पार्लेकर, माधवराव जाधव, स्व. आनंदराव आप्पा, स्व. हिंदुराव चव्हाण, विठ्ठलतात्या या सर्वांच्या कुटुंबातील लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे एकत्र येऊन सह्याद्रि’च्या सभासदांना न्याय देण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण आमच्यासोबतच 

मागील तीन महिन्यांपूर्वी मी वारसनोंदींचे जे निवेदन देणार होतो, त्याच्या आधी मी याबाबत आणि सह्याद्री साखर कारखान्याच्या एकूण कामकाजाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. तू बोललं पाहिजे, लोकांच्या अडचणी मांडल्या पाहिजेत, असं बाबा त्यावेळीच म्हणाले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही बाहेर पडलोय आणि उमेदवारी अर्ज भरलेत. विद्यमान चेअरमन लोकांची दिशाभूल करत असून पृथ्वीराज चव्हाण आमच्याच सोबत आहेत, अशी माहिती निवास थोरात यांनी यावेळी दिली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!
02:37