सह्याद्रि कारखान्याची निवडणूक केवळ राजकीय स्वार्थासाठी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची टीका; हिंगणगाव बुद्रुकमध्ये प्रचार सभा, कडेगाव तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –

विरोधकांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थासाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.

प्रचार सभा : हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथे आयोजित सह्याद्रि कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलप्रमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते.

…ही खरी चूक : स्व. पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्रि साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला असल्याचे सांगत आ. डॉ. कदम म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या कारखान्याची निवडणूक लागणे, ही खरी चूक आहे. या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘सह्याद्रि’मुळे सोनहिरे ची निर्मिती : ‘सह्याद्रि’च्या एनओसीमुळे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली, असे सांगताना आ. डॉ. श्री. कदम म्हणाले, त्या माध्यमातून या तालुक्याचा आर्थिक कायापालट झाला आहे. आदर्श कार्यपद्धतीबद्दल सह्याद्रि’चा राज्यात लौकिक आहे.

या निवडणुकीत खुर्द आणि बुद्रुक झालयं : विरोधात दोन पॅनल आहेत. त्यामुळे या निवडणुकीत खुर्द आणि बुद्रुक झालय, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पी. डी. पाटील पॅनलच्या पाठीशी संपूर्ण कडेगांव तालुका खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही श्री. कदम यांनी दिली.

अपघाताने आमदार झालेल्यांनी निवडणूक लावली : गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अपघाताने आमदार झालेल्यांनी या कारखान्याची निवडणूक लावली, अशी टीका करताना बाळासाहेब पाटील म्हणाले, अशा व्यक्तींना सभासद त्यांच्या भाषेत उत्तर देतील. सध्या ते माझ्यावर टीका करताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेत बोलत आहेत. विरोधकांत ताळमेळ नाही. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी पॅनेल उभा केले आहे. त्यांना स्वाभिमानी व निष्ठावंत सभासद धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण न परवडणारे  : सहकार क्षेत्र टिकणे काळाची गरज आहे, असे सांगताना आमदार अरुण लाड म्हणाले, चांगल्या चालणाऱ्या संस्थेत राजकारण करणे सभासदांसाठी न परवडणारे आहे. तेव्हा सर्व सभासदांनी पी. डी. पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्यांनी निवडणूक देण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपस्थिती : स्वागत सरपंच महेश कदम यांनी केले. यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रा.आशिष घार्गे, नेताजी यादव, सुरेश शिंगटे, विठ्ठल मुळीक सुरेश यादव, संभाजी बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत यादव, जितेंद्र पवार,विलास यादव, महेंद्र करांडे, लक्ष्मण पोळ यांच्यासह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्राध्यापक आशिष घार्गे यांनी मानले.

 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!