कराड/प्रतिनिधी : –
‘सह्याद्रि’ची निवडणूक ही कोणत्या राजकीय पक्षाची नसून सभासदांची आहे. या निवडणुकीशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही. त्यामुळे मी कुठेही सह्याद्रि कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने काहीही बोललेलो नाही. मात्र, काहींकडून माझ्या नावाचा खोटा प्रचार सुरू आहे. माझ्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पत्रकार परिषद : सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत आठवड्यात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीत पी. डी. पाटील पॅनलला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर श्री. चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.
‘सह्याद्रि’ तालुक्याची अस्मिता : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने सह्याद्रि साखर कारखाना उभारला असल्याचे सांगताना श्री. चव्हाण म्हणाले, हा कारखाना कराड तालुक्याची अस्मिता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता पक्ष अथवा कोणी काहीही केलं, तरी सुज्ञ सभासद योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहेत, ती ते घेतील.
माझ्या नावाचा खोटा अपप्रचार : ‘सह्याद्रि’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेकजण मला वारंवार भेटून गेले. परंतु, मी कोणालाही कसलाही शब्द दिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाचा खोटा व अपप्रचार सुरू असून सभासदांमध्ये संभ्रम पसरवण्याचे चुकीचं काम होत आहे. मात्र, याबाबत मी कोणालाही वकीलपत्र दिलेले नाही, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता श्री. चव्हाण यांनी लगावला.