पोस्टाच्या लाभदायी सेवा घरोघरी पोहोचविणार 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे; डिजिटल सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा 

कराड/प्रतिनिधी : – 

भारतीय डाक (पोस्ट) विभागाला मोठा इतिहास आहे. तार, पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र ते स्पीड पोस्ट आणि डिजिटल सेवांपर्यंत पोस्ट खात्याने खात टाकली असून नागरिकांसाठी अनेक दर्जेदार सेवा पुरवत आहे. परंतु, पोस्टाच्या अनेक लाभदायी योजनांबाबत नागरिकांना पुरेशी कल्पना नाही. अशा सर्व योजना आपण घरोघरी पोहोचविणार असल्याचा निर्धार कराड विभागाचे डाग अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी व्यक्त केला.

कराड : डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांचे स्वागत व सत्कार करताना व्ही. बी. कदम, ए. बी. देशमुख व सी. एम. नदाफ.

पदभार स्वीकारला : कराड विभागाचे नूतन डाग अधीक्षक म्हणून श्री बाळकृष्ण पोपट एरंडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उपस्थिती : यावेळी सहाय्यक डाक अधीक्षक व्ही. बी. कदम, डाक निरीक्षक ए. बी. देशमुख, डाक निरीक्षक सी. एम. नदाफ प्रामुख्याने उपस्थित होते.

पोस्ट खात्यात काळानुरूप बदल : पोस्टाच्या विविध योजना व अन्य विनम्र सेवा ग्राहकांना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना श्री एरंडे म्हणाले, पोस्ट खात्यात काळानुरूप मोठा बदल झाला आहे. यातील डिजिटल पोस्ट बँक सेवा ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायी आहे. गावोगावच्या पोस्ट मास्तर यांच्याकडे पोस्ट विभागाने डिजिटल मोबाईल घेण्यात आला असून त्या मार्फत विविध सेवा पुरवल्या जातात.

या सुविधांचा समावेश : डिजिटल मोबाईल द्वारे स्पीड पोस्ट, पार्सल व बुकिंग करता येते. तसेच आधार लिंकद्वारे १० हजार रुपयांपर्यंत पैसेही काढता येतात. पोस्टमनकडून घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करता येतो. तसेच बाल आधार योजनेअंतर्गत लहान मुलांचे पहिले आधार कार्ड मोफत काढून देण्यात येते. त्याचबरोबर पोस्टाच्या बँक खात्याद्वारे डायरेक्ट बेनिफिट सबसिडी देण्यात येते. तसेच सदर बँक खाते हे सर्व शासकीय योजनांसाठी ग्राह्य धरले जात असल्याचे श्री. एरंडे यांनी सांगितले.

गतिशीलता आणू : कराड डाक विभागांतर्गत कराड, पाटण, खटाव, आणि माण हे चार तालुके येतात. या संपूर्ण डाक विभागाचे एका महिन्यांत गतिशील कामकाज दिसेल, अशी ग्वाही देताना डाक अधीक्षक श्री. एरंडे म्हणाले, कराड विभागाच्या चार्ज स्वीकारल्या क्षणापासून आपण सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देण्यासह डाक विभागाचे कामकाज गतिशील करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काही आवश्यक फेरबदल करण्यात येतील.

ग्राहकांच्या सूचना अथवा व तक्रारींना प्राधान्य : ग्राहकांनाही कोणत्या गोष्टींबाबत तक्रार अथवा काही सूचना करावयाच्या असतील, तर त्यांचे म्हणणे प्राधान्याने ऐकून घेण्यात येईल. तसेच त्याबाबत त्यांचे सकारात्मक समाधानही करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

लाभदायी योजना : पोस्टाच्या सेवा व योजनांबाबत बोलता श्री. एरंडे म्हणाले, पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना आणि महिला सन्मान बचत पत्र योजना अत्यंत लाभदायी आहे. तसेच टपाल जीवन विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (अपघाती विमा योजना), डाक घर बचत बँक आदी योजनांचीही त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!