पृथ्वीराज चव्हाण; वारुंजी येथे महिला मेळावा उत्साहात, महिलांना स्वावलंबी बनण्याबाबत मार्गदर्शन
कराड/प्रतिनिधी : –
ज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील, त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महिला मेळावा : वारुंजी (ता. कराड) येथे कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. मानसी दिवेकर या व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं. स. सदस्य नामदेवराव पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली थोरात, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, सत्यजित ग्रुपच्या संचालिका भाग्यश्री पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण यांच्यासह कराड दक्षिणमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तिसरे महिला धोरण मी मांडले : महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा असला पाहिजे, असे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले. त्यानंतर २००१ साली स्व. विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले आहे.
महिला सबलीकरण : या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली, तरी त्याचे ग्रामपंचायतीपर्यंत अंमलबजावणी होते का? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात.
महिलांना 50 टक्के आरक्षण दिले : महिलांना 33 टक्के आरक्षण स्व. राजीव गांधींनी केंद्रीय पातळीवर लागू केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच महिलांना ५० टक्के आरक्षण माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दिले गेले, असे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे जरी असले, तरी त्यासाठी अधिकार नक्की काय आहेत, ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणासाठीचे पहिले पाऊल होते.
महिला स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शन : यावेळी व्याख्यात्या प्रा. मानसी दिवेकर यांनी महिलांना स्वावलंबी बनण्याचे मार्गदर्शन केले. तसेच महिलांचे जीवन किती संघर्षमय असते, ते कवितेतून सादर केले. यावेळी विदयाताई थोरवडे, नामदेवराव पाटील, अल्पनाताई यादव आदींची भाषणे झाली.
