
ह. भ. प. विठ्ठल स्वामी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; यशवंत महोत्सव उत्साहात साजरा
कराड/प्रतिनिधी : –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामकृष्ण वेताळ यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांचा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद देऊन सन्मान करावा. यामुळे त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्यासह राज्याला एक चांगला चेहरा, उमदे नेतृत्व मिळेल, असे मत श्री जयराम स्वामी वडगावकर महाराज मठाचे मठाधिपती ह. भ. प. विठ्ठल स्वामी महाराज वडगावकर यांनी व्यक्त केले.
यशवंत महोत्सव 2025 : येथील प्रीतिसंगमावरील कृष्णामाई घाटावर यशवंत बँक, कराडच्या वतीने यशवंत महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह. भ. प. सुप्रियाताई साठे यांच्या कीर्तन सेवाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ह. भ. प. विठ्ठल स्वामी महाराज वडगावकर बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी यशवंत महोत्सवाचे आयोजक व बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, बँकेचे संचालक अॅड. विशाल शेजवळ, यशवंत महोत्सवाचे प्रायोजक, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महिला कीर्तनकार ह. भ. प. सुप्रियाताई साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छ, निर्मळ मनाचे नेतृत्व : रामकृष्ण वेताळ हे सातारा जिल्ह्यातील एक तरुण, तडफदार व उमदे नेतृत्व आहेत. त्यांच्यात राजकीय नेतृत्वगुण आणि वक्तृत्व कौशल्य असल्याचे सांगत विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी तिच्या स्वच्छ पाण्याने सर्वांना पवित्र करते, असा सातारा जिल्ह्याचा इतिहास आणि परंपराही आहे. तितक्याच निर्मळ, स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व व नेतृत्व रामकृष्ण वेताळ यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या कार्याची नक्कीच सरकारी पातळीवर दखल घ्यायला हवी.
देव, देश, धर्म आणि संस्कृतीचा अभिमान : श्री वेताळ यांच्या मनामध्ये राजकारणासोबतच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची तळमळ असून त्यांच्याप्रति प्रेम भावही आहे. असे सांगत श्री विठ्ठल स्वामी म्हणाले, त्यांचे वक्तृत्व युवकांना प्रेरित करणारे असून विविध गोष्टींचे औचित्य साधून राबवण्यात येणाऱ्या चिंतन, कीर्तन, प्रवचन, रामलीला आदी धार्मिक कार्यक्रमांमधून त्यांच्या मनात असलेला देव, देश, धर्म आणि संस्कृतीबद्दलचा अभिमान दिसून येतो. तसेच समाजात प्रबोधन आणि परिवर्तन करण्याचा ध्यास त्यांच्या मनात आहे.
सर्वांगीण कार्याची दखल घ्यावी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांगीण कार्याची दखल घेऊन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ यांची निवड करावी. यामुळे सातारा जिल्ह्याला त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा चांगला चेहरा देऊन महाराष्ट्राच्या नावलौकिकासह विकासातही भर पाडावी, अशी विनंतीही मठाधिपती ह. भ. प. विठ्ठल स्वामी महाराज यांनी यावेळी केली.
उद्घाटन समारंभ : दरम्यान, या तीन दिवशीय यशवंत महोत्सवाचा उद्घाटन समारंभ रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, यशवंत महोत्सवाचे आयोजक व बँकेचे चेअरमन महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
उपस्थिती : यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य सागर शिवदास, कराड मंडल अध्यक्ष एकनाथ बागडी, ह.भ.प. सुप्रियाताई साठे, संचालक अॅड. विशाल शेजवळ, तसेच यशवंत बँकेचे सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशवंत महोत्सवास नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कराडला पुन्हा संधी मिळावी
कोणतेही पद नसताना डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यावधींची विकासकामे केली. तसेच युवकांचे संघटन बांधून पक्ष वाढीसाठी झंजावात उभारला. याची पोहोचपावती त्यांना नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली. दरम्यान, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या कार्याची दखल घेत जुलै 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुलबाबांची पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला होता. रामकृष्ण वेताळ यांच्या रूपाने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला सक्षम व उमदे नेतृत्व मिळाले आहे. त्यांनीही पक्ष आणि पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यावधींचा विकासनिधी आणला असून त्यांचेही युवक संघटन, पक्षनिष्ठा आणि कार्य वाखाणण्याजोगे आहे. 2024 च्या निवडणुकीत कराड उत्तरमध्ये कमळ फुलवण्यात रामकृष्ण वेताळ यांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामकृष्ण वेताळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदी संधी देत राज्यमंत्री पदाचा दर्जाही द्यावा. ह. भ. प. विठ्ठल स्वामी महाराजांनी “पुन्हा संधी मिळावी” या केलेल्या वक्तव्यमागे त्यांची हीच भावना असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे रामकृष्ण वेताळ यांच्या कार्याची योग्य दखल घेणार का? याकडे भाजप कार्यकर्त्यांसह कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि रामकृष्ण वेताळ समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.
