विविध संस्थांसह भाविकांचा सहभाग
कराड/प्रतिनिधी : –
आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे संत गाडगेबाबा जयंती, महाशिवरात्री, तसेच 120 व्या जागतिक रोटरी दिनाचे औचित्य साधून सदाशिवगड पायरीमार्गासह परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
जागतिक रोटरी दिन : जागतिक रोटरी दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत सदाशिवगड पायरी मार्ग आणि परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कराडने पुढाकार घेतला.
प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग : हा उपक्रम राबवण्यासाठी सदाशिव परिवार, शिवराय प्रतिष्ठान कराड, छत्रपती शिवाजी तरुण गणेश मंडळ, सदाशिवगड, कराड शहर स्वच्छता सतर्क समूहचे कार्यकर्ते यांना सोबत घेत रविवारी सकाळी सदाशिवगडावरील भाविकांनी सहभाग घेत गड परिसरात पडलेल्या प्लास्टिक बॅग्स, पाण्याच्या बॉटल्स गोळा करून रिसायकलिंगसाठी जमा केल्या. त्याचबरोबर पायरीमार्गावरील खडे, गवत साफ करण्यात आले.
योगदान : या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सचिव आनंदा थोरात, रोटरीयन प्रवीण परमार, गजानन माने, शिवराज माने, गजानन कुसुरकर, विनायक राऊत, सीमा करंजे आदींसह सदाशिव परिवार, शिवराय प्रतिष्ठान कराड, छत्रपती शिवाजी तरुण गणेश मंडळ, सदाशिवगड, कराड शहर स्वच्छता सतर्क समूहचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेत सुमारे तीन तासाहून अधिक काळ स्वच्छता मोहिम राबविली.
