डॉ. समीक्षा काळभोर यांना एमएससाठी एमआयटी मेडिकलला प्रवेश
कराड/प्रतिनिधी : –
सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व पाल उद्योग समूहाचे शिल्पकार ॲड. संजय काळभोर यांची कन्या डॉ. समीक्षा काळभोर यांना एमएस (ऑफ्थाल्मोलॉजी) शाखेसाठी एमआयटी मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे (पुणे) येथे प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल बेलवडे बुद्रुक गावचे सरपंच डॉ. सुशांत मोहिते, प्रतिथयश विधिज्ञ ॲड. वसंतराव मोहिते यांनी डॉ. समीक्षा काळभोर यांचा सत्कार करून भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अथक प्रयत्नांनी यश : समीक्षा यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हा मोठा टप्पा गाठला आहे. अभ्यासातील सातत्य, चिकाटी आणि अथक प्रयत्नांमुळे त्यांना हे यश संपादन करता आले. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या (एमओ) जबाबदारी सांभाळत त्यांनी आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वतःची आर्थिक जबाबदारीदेखील उचलली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
सामाजिक कार्याचा वारसा : समीक्षा यांचे वडील ॲड. संजय काळभोर यांनी कष्ट आणि मेहनतीने गावासाठी शाळा व पतसंस्था स्थापन केली. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांची कन्या समीक्षा पुढे नेत आहे. आपल्या डॉक्टरकीच्या प्रवासात ती समाजसेवा आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींचा उत्तम समतोल राखेल, अशी आशा ॲड. वसंतराव मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे : समीक्षा यांनी आता आणखी मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारत वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे, रुग्णसेवेसाठी आपले कौशल्य वापरून आपल्या कुटुंबाचे, तसेच गावाचे नाव मोठे करावे, असे मत सरपंच डॉ. सुशांत मोहिते यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
प्रोत्साहनामुळे यश : आपणास आई, वडील, सर्व कुटुंबियांच्या प्रोत्साहनामुळे हे यश संपादन करता आल्याचे सांगत वडिलांचा समाजसेवेचा वारसा वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून पुढे नेणार असल्याचे डॉक्टर समीक्षा काळभोर यांनी यावेळी सांगितले.
