आजी/माजी सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी काढले परिपत्रक
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा जिल्हा संरक्षण समिती, साताराचे सदस्य माजी सैनिक प्रशांत कदम यांनी आजी/माजी सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना नाहक त्रास होत जात असल्याबाबतच्या काही घटनांचा दाखला देत यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली होती. याची दाखल घेत यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी एक आढावा बैठक घेत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या मागणीला यश आले आहे.
आढावा बैठक : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात, महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग उपसंचालक व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे (नि.) याच्या सहकार्याने आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबाबत ‘सैनिक संरक्षण समिती’ची शुक्रवार (दि. 14) रोजी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला सर्व माजी सैनिक संरक्षण समिती सदस्य उपस्थित होते.
समस्या, अडचणींवर चर्चा : या बैठकीदरम्यान सैनिकांच्या समस्या, अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशांत कदम यांनी आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय वशहीद जवान कुटुंबीय यांच्यावर पोलीस ठाण्यात बिना चौकशी करता खोटे गुन्हे दाखल होत असल्याने त्यांना नाहक त्रास होत असल्याचे सांगितले.
परिपत्रक : यासंबंधी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पोलीस महासंचालक यांना 6 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होउ नयेत, अगोदर संपूर्णपणे चौकशी व्हावी, असे परिपत्रक काढून सुचित केले होते. त्या परिपत्रकाची कदम यांनी पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याबाबत परिपत्रक काढल्याने श्री कदम यांनी त्यांचे आभार मानले.
