घरकुल लाभार्थ्यांना ‘प्रकाश’ही मिळणार मोफत 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार मनोज घोरपडे; प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा क्र. 2 च्या  लाभार्थांना घरकुलांची मंजूरीपत्रे प्रदान 

कराड/प्रतिनिधी : – 

घरकुल लाभार्थ्यांना आता प्रत्येक घरकुलासाठी जादाचे 50 हजार रूपये मिळणार आहेत. तसेच त्यासोबत आता सोलर यंत्रणा मिळणार असल्याने घरकुलच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत, असे प्रतिपादन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी केले.

घरकुलांची मंजुरीपत्रे प्रदान : येथील प्रशासकीय कार्यालयात ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्र. 2 मध्ये कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थांना आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते घरकुलांची मंजूरीपत्रे देण्यात आली.

उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, नायब तहसिलदार बाबूराव राठोड, महेश उबारे, नाना शिंदे उपस्थित होते.

लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा : कराड तालुक्यात एकूण 5 हजार 884 घरकुलांचे उद्दीष्ट होते. यापैकी 4 हजार 714 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून यातील 3 हजार 876 लाभार्थांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला.

50 हजारांची वाढ : यापूर्वी घरकुलांसाठी सुमारे 1 लाख 58 हजार रूपयांचा निधी मिळत होता. यात आता आणखी 50 हजार रूपयांची वाढ केल्याने लाभार्थांना मोठया दिलासा मिळाला आहे.

ऐतिहासिक निर्णय : अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजा प्रत्येकाच्या आहेत. सर्वच गोरगरीब व बेघरांना आपल्या हक्काचे घर असावे, असे वाटते. अश्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगत आमदार मनोज घोरपडे म्हणाले, त्यानुसार आज शनिवारी राज्यातील 20 लाख घरकुल लाभार्थांना एकाचवेळी मंजूरीपत्र देण्याचा ऐतिहासिक क्षण पार पडला.

गायरान/जागा खरेदीसाठी निधी : बेघर लोकांना घरकुलासाठी गायरान मधून जागा देण्याचा, अन्यथा अर्धा गुंठा जागा खरेदी करण्यासाठी निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे सांगत आता भुमिहीनांनाही हक्काचा निवारा मिळणार असल्याचे आ. घोरपडे यांनी सांगितले.

जबाबदारी वाढली : घरकुलांना मंजुरी व पहिला हप्ता मिळाल्यानंतर आता लाभार्थी व प्रशासनाचीही जाबाबदारी वाढली असल्याचे सांगत गटविकास अधिकारी प्रताप पाटील म्हणाले, प्रत्येक घरकुल दर्जेदार व वेळेत पुर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याने त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लाभार्थी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!