कराड/प्रतिनिधी : –
पुणे-बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे शनिवारी सायंकाळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अचानकपणे कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. परंतु, आगीमध्ये कार संपूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले.
पाचवड फाटा येथील घटना : याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवार (दि. 22) रोजी सायंकाळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरानजीक पाचवड फाटा येथे सातारा-कोल्हापूर लेनवर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कारने अचानकपणे पेट घेतला. सदर प्रकार कार चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारवर नियंत्रण मिळवत कार महामार्गाच्या कडेला उभी केली.
डी. पी. जैन कंपनीच्या अपघात विभागाची मदत : याबाबतची माहिती डी. पी. जैन कंपनीच्या अपघात विभागाचे दस्तगीर आगा यांना मिळाल्यानंतर श्री आगा यांच्यासह सुनील कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमनच्या जवानांनी आग विझविली : दस्तगीर आगा यांनी अग्निशमन बंबाला पाचारण केले. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझविली. परंतु, या भीषण आगीमध्ये कार संपूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
वाहतूक विस्कळीत : राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार झाल्याने महामार्गावर प्रवाशांसह बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अग्निशमनच्या जवानांनी आग विझविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
