बाळासाहेब पाटील यांची माहिती; वर्षभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल, वेणूताई चव्हाण स्मरणिका व अर्धपुतळा अनावरण
कराड/प्रतिनिधी : –
देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, तसेच सुवर्ण महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी देशासह राज्याच्या सर्वांगीण विकारासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नी स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांचेही साहेबांच्या यशस्वी वाटचालीत मोलाचे योगदान राहिले आहे. वेणूताई चव्हाण यांचा जन्म फलटण येथे २ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. यामुळे २०२५-२६ हे वर्ष स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये ‘वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी महोत्सव’ साजरा करण्यात येणार असून वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषद : श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड व सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाची माहिती देण्यासाठी शुक्रवारी येथील वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, सचिव जयंतकाका पाटील, अरुण पाटील, नंदकुमार बटाणे, अशोक पोतदार, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार, श्रीमती डॉ. स्वाती सरोदे, अशोकराव डुबल उपस्थित होते.
औपचारिक सुरुवात : या महोत्सवाची औपचारिक सुरुवात वेणूताई चव्हाण यांच्या ८५ वर्षीय भाच्या यांचा २ फेब्रुवारी २०२५ फलटण येथे सत्कार करून करण्यात आल्याचे सांगत महोत्सवातील वर्षभरातील कार्यक्रमांबाबत माहिती देताना बाळासाहेब पाटील म्हणाले, १० मार्च रोजी वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्ववान माजी विद्यार्थिनींचा सत्कार, एप्रिलमध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर, १ मे रोजी देवराष्ट्रे, विरंगुळा, सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, प्रीतिसंगम समाधीस्थळ, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड याठिकाणी मान्यवर व विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट, तर १ जून वेणूताई चव्हाण यांचे जन्मस्थळ फलटण ते कराडपर्यंत वेणूताई चव्हाण स्मृतीज्योत आणण्यात येणार आहे. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार असून ज्योत आगमन समारंभात सुगमगीत गायन कार्यक्रम होणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धा : तसेच जुलैमध्ये महिला बचतगटांची एकदिवसीय कार्यशाळा, त्यांनी उत्पादित केलेले साहित्याचे प्रदर्शन, त्याचबरोबर वृक्षारोपन करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक व खुल्या गटात चित्रकला स्पर्धांचे आयोजन, सप्टेंबर प्रतिवर्षाप्रमाणे राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा, ऑक्टोबरमध्ये मध्यवर्ती युवा महोत्सव व रक्तदान शिबिर, २५ नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा व आंतरविभागीय महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन, डिसेंबरमध्ये ‘ही ज्योत अनंताची’ ग्रंथ प्रकाशन व ‘जात्यावरच्या ओवी’ संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
स्मरणिका व अर्धपुतळा अनावरण : तर जानेवारी २०२६ लोककला जागर कार्यशाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सौ. वेणूताई चव्हाण जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, तसेच १ फेब्रुवारी २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सौ. वेणूताई चव्हाण विशेष स्मरणिका प्रकाशन आणि अर्धपुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे.
वर्षभर विविध उपक्रम : दरम्यान, जन्मशताब्दी महोत्सवामध्ये वर्षभरात संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये वाय.सी. कॉलेजच्या प्राध्यापकांची व्याख्याने होणार आहेत. तसेच वेणूताई इंग्लिश मीडियम स्कूल, कराड यांच्यावतीने विविध शालेय स्पर्धा, वृक्षारोपण, पालक महिला व्याख्यानमाला, हस्तकला प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. वर्षभरातील नियोजित कार्यक्रमांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच या कार्यक्रमांमध्ये तत्कालीन नियोजनानुसार बदल होऊ शकतात, ते त्या त्या वेळी कळवले जातील, असेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
