कराड/प्रतिनिधी : –
मानवाची सेवा म्हणजे परमेश्वरांची सेवाच आहे. ही सेवा करताना असलेल्या दुःखालाही सीमा नाही. पण मानवता समजून केलेल्या सेवेला सीमा नाहीत. याचे भान ठेवून नव्या पिढीने मानवतेच्या सेवेसाठी स्वतःचे योगदान द्यावे, हीच खरी देशभक्ती असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वतवानी यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिक मेळावा : उंडाळे (ता. कराड) येथे थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दादासाहेब उंडाळकर यांच्या 51 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात 42 व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांना यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमास रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कार्यक्रमाचे संयोजक ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, विश्वस्त गणपतराव कणसे, ॲड. विजय पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, निवृत्ती सैनिक संघटनेचे प्रशांत कदम, माजी सभापती आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांचे भूमी पुरस्कार मिळाल्याचे समाधान : स्वर्गीय दादा उंडाळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण स्मारक समितीचे ऋणी आहोत. तसेच स्मारक समितीच्या वतीने स्वातंत्र सैनिकांच्या भूमित त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा अभिमान व आनंद असल्याचे डॉ. भरत वतवानी यांनी सांगितले.
माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण : आपल्या कारकीर्दीत चार हजार पेक्षा अधिक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यात भरती करून दहशतवाद्यांनाही देशभक्त बनवले, हा माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण असल्याचे सांगत निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, सातारा जिल्हा, कराड तालुका स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांची पंढरी आहे. या जिल्ह्यात माजी सैनिकांचे मेळावे घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांचा सन्मान केला जातो, ही सैनिकांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट असून दादा उंडाळकर स्मारक समितीने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. माजी सैनिकांनी सेवेत भरती होताना भारतीय संविधानाला स्मरुण देशसेवेची शपथ घेतली होती. त्या शपथेप्रमाणे सेवानिवृत्तीनंतरही माजी सैनिकांनी देशसेवा व समाजसेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विलासराव पाटील-उंडाळकर यांनी आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी मोठे योगदान दिल्याची आठवणीही करून त्यांनी दिली.
मानपत्राचे वाचन : प्रारंभी, डॉ .भरत वतवांनी यांना देण्यात आलेल्या पुरस्कार मानपत्राचे वाचन स्मारक समितीचे विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनाजी काटकर, कार्यक्रमाचे संयोजक ॲड. उदयसिंह पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.