आदराने पाय धरावेत, अशी आदरणीय माणसे महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात फार थोडी भरली आहेत. अशा थोड्या माणसांमध्ये आदरणीय नाना तुमचा नंबर खूप वरचा आहे. गोरगरिबांची कामे करताना नाना तुम्ही कोणालाही ना म्हटले नाही, म्हणूनच तुम्ही सर्वांचे नाना आहात. घरी आलेली कोणी असो गरीब की, श्रीमंत तुम्ही त्यांचा आदराने पाहुणचार करता ही तुमच्या घराची संस्कृती संस्कार मी अगदी जवळून पाहिले आहेत. तुमचे घर राजकारणी नानांचे असले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी ते मंदिर वाटते. ज्या घरात पती-पत्नी, मुले, सुना, नातवंडे समजूतदार आहेत, ते घर स्वर्गाहून सुंदर वाटते. याचे कारण तुमचा चेहरा म्हणजे प्रसन्नतेच घर आहे. हृदय दयने भरले आहे, तर वाणी अमृता सारखी मधुर वाटते.
एका सामान्य कुटुंबातील एक सामान्य माणूस जेव्हा असामान्य काम करतो; तेव्हा ते जनसामान्यांना समजण्यासाठी नाना तुमचा भव्य दिव्य सत्कार झाला पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. माणसाचा दानव होणे हा पराभव आहे. माणसाचा महामानव होणे, हा चमत्कार आहे. तर माणसाचा माणूस होऊन माणसाप्रमाणे वागणं हा विजय आहे. आता दानव व्हायचं का महामानव व्हायचं का माणूस म्हणून माणसासारखा जीवन जगायचे, हे तू ठरव कारण तूच आहेस. तुझ्या जीवनाचा शिल्पकार ! असे डॉ. राधाकृष्णन भूतपूर्व राष्ट्रपती यांनी म्हटले आहे. नाना तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार मायेची सावली देणारी तुम्ही वटवृक्ष आहात.
महाराष्ट्रात सोन कदाचित कमी असेल, पण सोन्यासारख्या माणसांची वानवा महाराष्ट्राला कधीच पडली नाही. महाराष्ट्राची दुर्दैव इतकच की अशा सोन्यासारख्या माणसाची गुणगौरव करताना आमची जीभ अडकते. तर आम्ही थोडेफार लेखन करीत असू; तर आमची लेखणी मंद होते, हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावे लागेल.
नाना जेव्हा केव्हा मी कराड शहरात मेन रोडने जातो, तेव्हा मी मनोऱ्या जवळ गेल्यावर थोडा वेळ थांबतो. मानवर करून मनोऱ्याकडे पाहतो आणि विचार करतो. माझ्या मनात असा विचार येतो की, हे मनोरे माझ्याबरोबर बोलत आहेत आणि मला सांगत आहेत. ‘अरे भल्या माणसा, कराड शहरात राहणारी लोक विचाराने व कार्याने माझ्या उंचीची होतील. मग मला कराड परिसरातील महत्त्वाचे नेते आठवतात. मग यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई, प्रेमलाकाकी चव्हाण, पी. डी. पाटील,यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले आदी नेत्यांचे कार्य आणि विचार हे कराड शहरातील मनोऱ्याच्या उंचीचे आहेत, याची साक्ष हे मनोरे देतात’. या थोर नेत्यांचा वारसा तुमच्याकडे असून तुम्ही वारसदार आहात. याचा सार्थ अभिमान सामान्य लोकांना वाटतो; हा तुमचा आणि तुमच्या विचाराचा विजय आहे, असे मला वाटते. धन्यवाद !
– दादासाहेब तुकाराम कदम, (सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मलकापूर, ता. कराड)
