शेतीचे विदयुत पुरवठा वेळापत्रक बदलण्याचे कारण काय?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतीमित्र अशोकराव थोरात; राज्य शासनासह वीज वितरण कंपनीने खुलासा करावा

कराड/प्रतिनिधी : –

शेतीसाठी दिवसा अखंड विदयुत पुरवठा ही गरजेची बाब आहे. मात्र, राज्य शासन व वीज वितरण कंपनीकडून शेतीला दिवसा व रात्रीचे वीज पुरवठा केला जातो. त्यातही विजेचे वेळापत्रक दर महिन्याला बदलण्यात येते, यामागचे नेमके कारण काय, हे शेतकऱ्यांना अदयापही समजले नाही. इतर क्षेत्रातील विदयुत ग्राहकांना अशाप्रकारे विदयुत पुरवठा करता का? असा सवाल उपस्थित करून याचा राज्य शासनासह वीज वितरण कंपनीने खुलासा करावा. तसेच शेतीच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करू नये, अशी मागणी शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धपत्रक : या पत्रकात म्हटले आहे की, शेतीसाठी आठवडयातून शुक्रवार, शनिवार व रविवारी दिवसा सहा तास वीज मिळते. ती सकाळी 8 ते सायं. 6 पर्यंत कुठल्याही 8 तासासाठी असते. पण, जानेवारीमध्ये सकाळी 6.50 ते दुपारी 2.50 अशी दिलेली वेळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची आहे. तसेच रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार रात्रीची वेळ 9 ते सकाळी 7 पर्यंत 8 तासांची द्यायला हवी. मात्र, कधी-कधी रात्री 10.30, 11 ते सकाळपर्यंत दिली जाते, ही बाब चुकीची आहे.

जंगली जनावरांची भीती : शेतीला रात्रीच्या वेळेत पाणी देणे अंधारामुळे शक्य होत नाही. त्यामध्ये अलीकडे जंगली जनावरांची भिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. साप, विंचू, काटे यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो. राज्यात हजारो शेतकरी रात्रीच्या अंधारात होणाऱ्या सर्पदंशामुळे मृत्यू पावतात.

विजेचा अपव्यय व उत्पन्नात घट : चुकीच्या वीज नियमन वेळेमुळे कमी उपलब्ध असलेल्या पाण्याची नासाडी होते. तसेच विजेचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. महाराष्ट्रात शेतकरी सोडून इतर सर्व वर्गाला नियमितपणे 24 तास हवी तेवढी वीज पुरवली जाते. मात्र, शेतकरी हा अन्नदाता असूनही त्याला पायाभूत सुविधांमधील वीज दिवसा योग्यवेळी पुरविली जात नाही.

विजेची ज्यादा भरपाई मिळत नाही : दिवसाच्या वीज पुरवठयात तांत्रिक अडचणीमुळे खंड पडल्यास त्याची भरपाई जादा वीज पुरवठा करून केली जात नाही. शेतकऱ्यांना सकाळी 5.30 पासून 9 पर्यंत अनेक प्रकारची शेतीची व संसारिक कामे असतात. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या उपयोगाचा नसतो. तसेच शेतकऱ्याला झोपायच्या वेळेपर्यत म्हणजे 10 पर्यंत शेतातील पाण्याचे व्यवस्थापन करून घरी येता येते किंवा वस्तीवर थांबता येते. सकाळी 6 पर्यंत विदयुत पुरवठा मिळाल्यास शेतकरी वीजेच्या साहय्याने पाणीपुरवठा करू शकतो.

वीज पुरवठा वेळेत बदल करू नये : वरील सर्व बाबी विचारात घेऊन शेतकऱ्यांना मार्च 2025 पासून तीन दिवसांची वीज सकाळी 9 ते 5 पर्यंत करावी, शेतीसाठी रात्रीचा विदयुत पुरवठा रात्री 10 ते 6 या वेळेतच करण्यात यावा, अशी मागणीही श्री थोरात यांनी सदर पत्रकाद्वारे केली आहे. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!