अहिल्यादेवी बँक सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करेल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

सुंदरगिरीजी महाराज; कराड शाखेचा शुभारंभ उत्साहात, ग्राहकांना जलद व सुरक्षित सेवा देण्यास कटिबद्ध – तुपे

कराड/प्रतिनिधी : –

अहिल्यादेवी बँकेच्या उज्ज्वल वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे यांचे विशेष कौतुक करत, शिवसमर्थ मल्टीस्टेट प्रमाणेच अहिल्यादेवी बँक देखील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे (पुसेगाव) मठाधिपती गुरुवर्य १०८ प.पु. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

शुभारंभ : अहिल्यादेवी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूरच्या पहिल्या शाखेचा भव्य शुभारंभ कराड येथे उत्साहात पार पडला. शाहू चौक येथील समर्थ प्राइड येथे झालेल्या या समारंभात प.पु. श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व महालिंगेश्वर मठ संस्थान, करवडीचे प.पु. शिवयोगी विजयलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शिवसमर्थ परिवाराचे कुटुंबप्रमुख अॅड. जनार्दन बोत्रे, शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्हा. चेअरमन शिवाजी सुर्वे, माजी आमदार आनंदराव पाटील, युवा उद्योजक दत्तात्रय देसाई, दिलीपराव चव्हाण, महेश पाटील, आर. टी. स्वामी, डॉ. अमित बोत्रे, आशिष थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्राहकांना जलद व सुरक्षित सेवा देण्यासाठी कटिबद्ध : बँकेचे महाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी मान्यवरांचे स्वागत करत बँकेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, अहिल्यादेवी बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यास कटिबद्ध आहे. बँकेच्या ग्राहककेंद्रित धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. विशेषतः, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बँक विविध योजनांचा अवलंब करणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा बँकेचा प्रयत्न असेल.

बँकेतर्फे विविध सेवा : अहिल्यादेवी बँक अत्याधुनिक कोअर बँकिंग प्रणालीसह ग्राहकांना एटीएम, एनइएफटी, आरटीजीएस सेवा, एसएमएस बँकिंग सेवा, तज्ञ व अनुभवी सेवकवर्ग पाच लाखांपर्यंत ठेवींसाठी विमा संरक्षण, चेक आणि डिमांड ड्राफ्ट सुविधा, वातानुकूलित कार्यालय, तसेच ज्येष्ठ नागरिक व संस्थांसाठी मुदत ठेवींवर ०.५० टक्के जादा व्याजदर अशा विविध सेवा उपलब्ध असल्याचे श्री तुपे यांनी सांगितले.

शिवसमर्थ परिवाराचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल : शिवसमर्थ परिवाराचे मार्गदर्शन अहिल्यादेवी बँकेसाठी मोलाचे ठरेल, असे सांगून चंद्रकांत चव्हाण म्हणाले,  शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अनेक शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहेत आणि याच परिवाराचे कुटुंबप्रमुख अँड जनार्दन बोत्रे या अहिल्यादेवी सहकारी बँकचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक अल्पावधीत जनमानसात नावलौकिक प्राप्त करेल.

मोलाचे योगदान : कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी बँकेचे ठेवीदार, सभासद, हितचिंतक व्यापारी, तसेच सहकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन करून डॉ. संदीप डाकवे यांनी आभार मानले.

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!