आनंदराव लादे; भिमशक्तीची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी, अन्यथा, जनआंदोलन उभारण्याचा इशारा
कराड/प्रतिनिधी : –
सध्या वीज वितरण कंपनीकडून घरोघरी डिजिटल स्मार्ट वीज मीटर लावली असून ती चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. परंतु, सध्या राज्य शासन आणि वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर लावण्याची सक्ती केल्याचा जीआर समाजमाध्यमांवर फिरत आहे. हा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असून शासनाने सदरचा जीआर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आनंदराव लादे यांनी केली आहे. अन्यथा, जनआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदन : भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : यावेळी संघटनेचे पदाधिकारी श्रीरंग वाघमारे, संजय कांबळे, दत्ता पवार, जान फाउंडेशनचे जावेद नायकवडी व मानव कल्याणकारी संघटनेचे सलीम पटेल उपस्थित होते.
डिजिटल स्मार्ट मीटर कार्यक्षम : पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात राज्य शासनाच्या उर्जा विभागाच्या अधिनस्त असलेल्या वीज वितरण कंपनीची संबंधित यंत्रणा अलीकडे घरगुती प्रीपेड स्मार्ट वीज मीटर लावणार असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर गाजत आहे. मात्र, सध्या वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या घरोघरी जी डिजिटल स्मार्ट मीटर लावली आहेत, ती मीटर सुस्थितीत असून चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.
वीज ग्राहकांना वेठीस धरणे अन्यायकारक : एखादा अपवाद वगळता डिजिटल स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्याही वीज वितरण कंपनीकडे फार कमी तक्रारी आहेत. त्यामुळे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची गरजच नाही. घरगुती वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्याबाबत कोणत्याही प्रकारे मागणी केली नसताना शासन, प्रशासनाने ग्राहकांना याबाबत वेठीस धरणे अन्यायकारक आहे.
यात कोणाचा फायदा : एखाद्या कंपनीचा फायदा होण्याच्या दृष्टीने शासनाने हा घाट घातला आहे का? असा सवालही वीज ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.
ग्राहकांची मोठी गैरसोय : प्रीपेड स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. तसेच रात्री, अपरात्री प्रीपेड स्मार्ट मीटरचा रिचार्ज संपल्यास ग्राहकांना अंधारात चाचपडत रहावे लागेल. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास सोसावा लागण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्या वीज ग्राहकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम व हालाखीची आहे. त्यांना रिचार्ज संपल्यानंतर तात्काळ नव्याने स्मार्ट वीज मीटरचा रिचार्ज करणे शक्य होणार नाही, त्यांची मोठी गैरसोय होईल.
ग्राहक, नागरिकांमध्ये नाराजी : याबाबत वीज ग्राहक, तसेच सुजाण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला असून, भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य शासन, प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या भावनांचा, त्यांच्या विविध समस्यांचा विचार करुन सक्तीने प्रीपेड स्मार्ट वीज मीटर लावण्याचा जीआर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भिमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यथा, जनआंदोलन उभारू : त्याचबरोबर याची योग्य दखल न घेतल्यास याप्रश्नी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आनंदराव लादे यांनी सदर निवेदनाद्वारे दिला आहे.
माहितीस्तव निवेदनाच्या प्रती सादर : या निवेदनावर पदाधिकाऱ्यांची नावे व सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रति माहितीस्तव वीज वितरण कंपनी कार्यालय, ओगलेवाडी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.
