अॅड. उदयसिंह पाटील; उंडाळेत मंगळवारी स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात वितरण
कराड/प्रतिनिधी : –
स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वतवाणी यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त प्रा. गणपतराव कणसे यांनी दिली.
पत्रकार परिषद : उंडाळे (ता. कराड) येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने स्वा. दादा उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृतीदिनानिमित्त ४२ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळावा मंगळवार (दि. १८) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत (निवृत्त) यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या संयुक्तिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच मंगळवार (दि. १८) रोजी दुपारी २ वाजता स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदीर, उंडाळे येथे पुरस्काराचे वितरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. धनाजी काटकर उपस्थित होते.












