तानाजी देशमुख यांची मागणी; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना निवेदन सादर
कराड/प्रतिनिधी : –
कराड शहरात हॉटेल पंकज ते नांदलापूर फाट्यापर्यंत साडेतीन कि.मी. लांबीचा युनिक उड्डाणपूल निर्मितीच्या कामादरम्यान महामार्गावरील जुना पादचारीमार्ग (स्कायवॉक) जमीनदोस्त करण्यात आला. यामुळे शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम विभागातील (मलकापूर) नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यासाठी शास्त्रीनगरसाठी नवीन उड्डाणपूलाखालून कायमस्वरुपी क्रॉसिंगची सोय करावी, अशी मागणी कराड दक्षिण भाजपचे उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी केली आहे.
निवेदन : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना युवा नेते तानाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी नंदकुमार गायकवाड, शकिल मोमीन, विठ्ठल थोरात, विजय देशमुख, बबन वास्के, तेजस सोनवले, फारुक बागवान, राजेंद्र शिंगण, मंगेश सुरवसे, सुनिल मगदूम, सागर माने, अभिजित रैनाक, रामेश्वर महाराज, आण्णा डिसले, विकास शेवाळे, राहूल केंगार, संभाजी शेडगे, रोहित माने, असद तिगडीकर, विकास तिवारी, विजय जाधव यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
युनिक उड्डाणपूल : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर अपघातप्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी, केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील कराड, मलकापूरमध्ये नवीन सहापदरी उड्डाणपुलास मंजुरी दिली असून, सध्या या पूलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर पूल हा भारतातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला सहापदरी पूल ठरणार आहे. या पुलामुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे.
जुना स्कायवॉक जमीनदोस्त : येथील हॉटेल पंकज ते नांदलापूर फाट्यापर्यंत साडेतीन कि.मी. लांबीचा युनिक उड्डाणपूल तयार होत आहे. पूर्वी शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम विभागातील नागरिकांसाठी महामार्गावरून ये-जा करण्यासाठी पादचारीमार्ग (स्कायवॉक) होता. उड्डाणपुलाच्या कामामुळे तो पाडण्यात आल्याने स्थानिकांची गैरसोय झाली आहे.
स्थानिक नागरिकांची गैरसोय : या भागामध्ये विद्यालय, महाविद्यालय, दवाखाने, बालसुधारगृह, रहिवासी, व्यवसायिकांची संख्या लक्षणीय आहे. मलकापूरच्या लोकल प्लॅनिंगसाठी भविष्यात वाहतुकीच्या निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी याठिकाणी क्रॉसिंगची नितांत गरज आहे.
क्रॉसिंग जंक्शनची गरज : यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, आरोग्य सुविधा, विद्यार्थी, रहिवासी नागरिक यांची गैरसोय दूर करण्यासाठी बागवान ट्रान्सपोर्ट, खरेदी विक्री पेट्रोल पंप, उड्डाणपूल पिलर क्र. 71 ते 75 दरम्यान उड्डाणपूलाखालून ओपनिंग देऊन कायमस्वरूपी क्रॉसिंग जंक्शन रोटरी तयार करण्यात यावी. यामुळे या भागातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, व्यवसायिक, स्थानिक रहिवासी यांना दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होईल. त्यादृष्टीने संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती सादर : या निवेदनावर अनेक स्थानिक नागरिकांची नावे व सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती माहितीस्तव कराड प्रांताधिकारी व तहसीलदार, कराड शहर पोलीस ठाणे, प्रोजेक्ट मॅनेजर व्ही. डी. पंढरकर (एनएचएआय), डी. पी. जैन कंपनीचे प्रकल्प संचालक आणि मलकापूर नगरपालिकेला देण्यात आल्या आहेत.
