भिमशक्तीची मागणी; जखमीच्या उपचारार्थ खर्च द्यावा, अन्यथा तीव्र लढा उभारण्याचा इशारा
कराड/प्रतिनिधी : –
सध्या पुणे-बंगळूरू महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गतीने सुरु आहे. परंतु, संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जात नसल्याने महामार्ग व सेवा रस्त्यांवर अपघातांची मालिकाच सुरु आहे. यामध्ये काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकांना गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवाव्यात. तसेच वहागाव येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहन कुंभार याच्या उपचारार्थ हॉस्पिटलचा खर्च द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भिमशक्ती सामाजिक संघटनेने दिला आहे.
निवेदन : याबाबतचे निवेदन गुरुवारी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले.
उपस्थिती : यावेळी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष कुंदन वाघमारे, जान फौंडेशनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांच्यासह अपघातातील जखमी रोहन कुंभारचे वडील अनिल कुंभार व त्याची बहिण सावित्री कुंभार उपस्थित होते.
ठिकठिकाणी खोदकाम व राडारोडा : या निवेदनात म्हटले आहे की, कराड शहरानजीक महामार्गाच्या सहापदरीकरण कामासाठी पुणे-कोल्हापूर आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही लेनचे व दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांचे एकाचवेळी काम सुरु असून त्यासाठी ठिकठिकाणी उड्डाणपूल, मोरी, फुटपाथ, नाले आदी बांधकामे करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी राडारोडा पडला आहे. शिवाय काम सुरु असल्याबाबत आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुचना फलक, बॅरीकेट्स व रिप्लेक्टर लावलेले नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यात चढ-उतार तयार झाले असून काही ठिकाणी रस्त्यात मध्येच मोठा उंचवटा व खोलगट भाग तयार झालेत. यांमुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यातील खड्डे, उंचवटा, राडारोडा पडल्याचे तत्काळ लक्षात येत नसल्याने महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. यात सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे होत असून, प्रसंगी दुचाकी चालकांना जीव गमवावा लागत आहे.
जखमीच्या उपचारार्थ खर्च द्या : दरम्यान, कोल्हापूर नाका आणि वहागाव येथे एका महिन्यात दोन दुचाकी चालकांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना गाडल्या आहेत. शनिवार (दि. १) फेब्रुवारी रोजी वहागाव (ता. कराड) येथील हॉटेल अशोकासमोर रोहन कुंभार या दुचाकीस्वाराचा अपघात होऊन यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. कुंभार कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. त्यामुळे सदर अपघातास कारणीभूत असलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीने अपघातातील जखमी रोहन कुंभारच्या उपचारार्थ हॉस्पिटलचा खर्च द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा, तीव्र लढा उभारून : प्रशासन व महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदारास सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ आवश्यक उपाययोजना राबवण्याच्या सूचना द्याव्यात. त्याचबरोबर यापुढे अपघात झाल्यास जबाबदार ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा, भिमशक्ती सामाजिक संघटनेसह अन्य संस्था, संघटना व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लढा उभारण्यात येईल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा सूचनावजा इशाराही सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती : या निवेदनाच्या प्रती माहितीस्तव आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, पोलीस उप अधीक्षक व प्रांताधिकारी कराड आणि डी. पी. जैन कंपनीच्या कराड विभागाला देण्यात आल्या असून निवेदनावर आनंदराव लादे, कुंदन वाघमारे, जावेद नायकवडी यांच्यासह अपघातातील जखमी रोहन कुंभारचे वडील अनिल कुंभार व त्याची बहिण सावित्री कुंभार यांची नावे व सह्या आहेत.
