नेकलेस रोडमुळे कराडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. अतुल भोसले यांची समाधीस्थळ व नदीघाट परिसराची एचसीपीच्या आर्किटेक्चर समवेत पाहणी

कराड/प्रतिनिधी : –

पुणे-बंगळुरू महामार्गावरून पंढरपूर, सांगली, तासगावकडे जाणार्‍या वाहनांची वाहतूक कराड शहरातून होत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी नवीन कोयना पूल ते नवीन कृष्णा पूल यांना जोडणारा नेकलेस रोड करण्यासाठी, तसेच दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे आणि नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून यामुळे कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात मार्गी लागेल. शिवाय नदीकाठ सुशोभीकरणामुळे शहारच्या सौंदर्‍यातही मोलाची भर पडेल, असे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.

पाहणी : येथील कृष्णा नदी घाटालगत स्वतंत्र नेकलेस पूल उभारून, स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला आहे. या अनुषंगाने देशविदेशात भव्य प्रकल्प सकरणार्‍या अहमदाबाद येथील एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि.’चे व्यवस्थापक कौस्तुभ शुक्ला व त्यांच्या पथकाससमवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गुरुवारी सकाळी प्रीतिसंगम घाटाची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, राजेंद्र माने, विनायक पावसकर, सुभाष डुबल, विजय वाटेगावकर, विनायक विभूते, नाना खामकर आदींची उपस्थिती होती.

विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना : याप्रसंगी सदर ठिकाणची पाहणी करत नियोजित नेकलेस रोड करत असतानाच साबरमती रिवर फ्रंटच्या धरतीवर कृष्णा नदीकाठ सुशोभीकरण करणे, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे आणि नदीकाठाचे सुशोभीकरण, पुरातन मंदिरे व वास्तूंचा विकास, नदी घाटावर पायरी मार्ग, ओपन प्रेक्षागृह, पर्यटकांसाठी सुविधा, प्रीतिसंगम बाग पुनर्निर्माण आदि बाबींचा समावेश करून त्याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्या.

सुधारणा व नवनिर्मितीबाबत प्राथमिक कल्पना : एचसीपीचे व्यवस्थापक कौस्तुभ शुक्ला यांनी सदरच्या सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती घेऊन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना याठिकाणी करावयाच्या सुधारणा व नवनिर्मितीच्या बाबतीत प्राथमिक कल्पना दिली.

अल्पावधितच कामास सुरुवात : या पाहणीनंतर बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ व कृष्णा नदीघाट परिसराची एचसीपी कंपनीच्या आर्किटेक्चर समवेत आज प्रत्यक्षा पाहणी करून नियोजित कामांचा आढावा घेतला. तसेच परिसराच्या एकूण विकास आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यासाठी संबंधित तज्ञ, नगररचनाकार व प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत वेळोवेळी आढावा घेत आलो आहे. हा संपूर्ण प्रकल्प निसर्गसंपन्न, पर्यावरणपूरक, विशेषतः पर्यटक व नागरिकांसाठी अधिक सुबक, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने मार्गी लावला जात आहे. लवकरच प्रत्यक्ष या कामाला सुरुवात करून या ऐतिहासिक स्थळाचा गौरव वृद्धिंगत करण्यासाठी वेगाने काम केले जाईल. महायुती सरकार यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

लवकरच हायड्रोलॉनिक सर्वेक्षण

एचसीपी कंपनीचे आर्किटेक्चर व त्यांच्या पथकाकडून लवकरच कृष्णा व कोयना नदी व समाधीस्थळ परिसरचा हायड्रोलॉनिक सर्वेक्षण करून भविष्याच्या दृष्टीने येत्या शंभर वर्षांचा विचार करून नदीपत्रात येणार्‍या पाणी पातळीचा आणि पाण्याच्या खोलीची शक्यता लक्षात घेऊन नेकलेस रोड व संरक्षण भिंतीची ऊंची वाढवल्यास त्याचा नदीपात्रावर काय परिणाम होईल, याचाही आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम देशपातळीवर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे असेल, असा विश्वासही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यावेळी व्यक्त केला. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!