चेअरमन बाळासाहेब पाटील यांची माहिती
कराड प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी निर्दोष मतदार यादी तयार करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (पुणे) यांनी फोड करून सादर करण्याच्या सूचना पत्रान्वये केल्या होत्या. त्यानुसार एकूण 30 हजार 130 पात्र सभासद मतदारांची प्रारूप यादी सादर केली. त्यासोबत शेअर्सची अपूर्ण रक्कम असलेल्या 2,221 आणि मयत एकूण 3,920 सभासदांच्या स्वतंत्र याद्या सादर केल्या होत्या. अपूर्ण शेअर्स असणारे सभासदही सह्याद्रि कारखान्यावर प्रेम करणारे आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी फोड करून मतदार यादी मागितली नसती, तर सरसकट मतदार यादी सादर केली असती, अशी माहिती माजी सहकार मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषद : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि कारखान्यावर सदर विषयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कारखाना प्रशासनाची भावना : जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मतदार यादीची फोड करून सादर केली. अन्यथा, कारखान्याने पात्र सभासद, शेअर्स अपूर्ण असणारे सभासद व मयत सभासदांची सरसकट यादी सादर केली असती. मतदार यादीवरील हरकती व आक्षेपांच्या कालावधीत शेअर्स अपूर्ण रक्कम असलेल्या 2,221 सभासदांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करावीत, अशी भावना कारखाना प्रशासनाची होती.
…तर तक्रारदारांनी ओरड केली असती : कायदेशीर बाब असल्याने सभासद यादीत नाव समाविष्ट करता येत नव्हते. तसे केले असते, तर काही तक्रारदारांनी, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सभासद वाढवले, अशी ओरड केली असती, असे सांगत चेअरमन बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी 2,221 सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास मान्यता दिली असली, तरी काही लोकांनी यात राजकारण केले आहे. वास्तविक हे 2,221 सभासद कारखान्याचे जुने सभासद असून ते सह्याद्रि कारखान्यावर प्रेम असून करणारे आहेत, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सभासदत्वापासून वंचित ठेवले नाही : अपूर्ण शेअर्स असलेल्या सभासदांना मतदार यादीत घेऊ नये, असा आक्षेप कारखाना प्रशासनाने घेतलेला नव्हता, सांगत चेअरमन श्री. पाटील म्हणाले, संस्था या कोणत्याही सभासदांचा हक्क हिरावला जावा, अशी कारखाना प्रशासनाची भावना कधीही नव्हती. त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचे असते, तर आम्ही शेअर्स रक्कम पूर्ण करण्याचे आवाहन केले नसते. गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीत कारखाना व्यवस्थापनाने कधीही सुडबुद्धीने व राजकीय आकसापोटी कोणाला सभासदत्वापासून वंचित ठेवलेले नाही, यापुढेही ठेवणार नाही.
अपूर्ण रक्कम भरणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट : प्रारूप मतदार यादीवर हरकतींची मुदत 27 जानेवारीपर्यंत होती. सभासदांनी अपूर्ण शेअर्सची रक्कम भरण्यासाठी 23 जानेवारी रोजी मी आवाहन केले होते. त्यानुसार 2,221 पैकी 567 सभासदांनी अपूर्ण रक्कम भरली. त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.
कारखान्याबाबत खोट्या अफवा : कारखान्याने उसाच्या उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली आहे. ऊस दरी रक्कम सोसायटी कर्ज, पाणीपट्टी, शासकीय पाणीपट्टी वजा जाता बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे वजनकाटे अचूक आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाबाबत सभासदांची कोणतीही तक्रार नाही. जे ऊस देत नाहीत, सभासद नाहीत. ज्यांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असे लोक कारखान्याबाबत खोट्या अफवा पसरवत आहेत, असेही चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
