साखर सहसंचालकांचे आदेश; शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आल्याची निवास थोरात यांची माहिती
कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या अपूर्ण भाग भांडवल असणाऱ्या २,२२१ सभासदांच्या नावांचा समावेश मतदार यादीमध्ये नसल्याने या विरोधात प्रादेशिक सहसंचालकांकडे दाद मागण्यात आली होती. त्याची अंतिम सुनावणी होऊन संबंधित नावे मतदार यादीत समाविष्ट करून, दुरुस्तीसह मतदार यादी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयास सहा फेब्रुवारीला सादर करण्याचे आदेश सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्याने आमच्या लढ्याला यश आले असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी दिली.
पत्रकार परिषद : प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मान्यवर : यावेळी कराड बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, वसंत पाटील, उमेश मोहिते, वहागावचे सरपंच संग्राम पवार, शैलेंद्र चव्हाण, भरत चव्हाण, दादासो चव्हाण, याचीकाकर्ते प्रशांत थोरात, बाळासो चव्हाण, शिवाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्ताधाऱ्यांचा राजकीय सूडबुद्धीने कुटिल डाव : सह्याद्री कारखान्याच्या मनमानी कारभाराविरोधात आपण प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तालयाकडे, तसेच बाळासो भिमराव चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, असे सांगत निवास थोरात म्हणाले, त्यात म्हटले होते की, सभासदांची भाग भांडवल रक्कम १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे २,२२१ सभासदांची रक्कम कारखाना प्रशासनाने राजकीय हेतूने पूर्ण करून न घेतल्याने या ऊस उत्पादकांना मतदार यादीतून वगळले आहे. सदर २,२२१ सभासदांना अंतिम मतदारयादीत समाविष्ट करण्यात यावे, यासाठी कायदेशीर तरतुदींचा दाखला देत आम्ही दाद मागितली होती.
प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश : सदर तक्रारीबाबत सुनावणी होवून प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांनी यावर निर्णय देताना, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या मतदारयादीत सदरची २,२२१ नावे समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री थोरात यांनी सांगितले.
यापुढेही लढा सुरूच ठेवणार : कारखान्याच्या सभासदांनी वारस नोंदीसाठी, तसेच अपूर्ण रक्कम भरलेल्या सभासदांच्या न्याय हक्कासाठी आपला पाठपुरावा सुरुच राहणार असून, हा लढा कायम राहणार असल्याचेही निवास थोरात यांनी यावेळी सांगितले.
