जीबीएससाठी कॉटेजमध्ये आठ बेड आरक्षित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची माहिती; आढावा बैठकीत तालुका आरोग्य प्रशासनास विविध सूचना

कराड/प्रतिनिधी : – 

येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) हे जीबीएस उपचारासाठीचे मुख्य केंद्र असणार आहे. याठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी आठ बेड आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच येथील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून जिल्ह्याच्या डीएचओ आणि सीओंशी चर्चा करून तेथील 22 डॉक्टर्स कराडला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

आढावा बैठक : येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी जीबीएस आजारासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. 

उपस्थिती : बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मुख्याधिकारी शंकर खंदारे व तालुका वैद्यकीय अधिकारी नरेंद्र माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सखोल चर्चा : या बैठकीत जीबीएस व्हायरसच्या रुग्णांची सध्याची स्थिती, त्यांची संख्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम आणि उपचार सुविधांची उपलब्धता यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आ. डॉ. भोसले यांनी प्रत्येक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी लागेल ती सर्व मदत कृष्णा समूह नक्कीच प्रदान करेल. यासाठी स्वच्छता आणि सफाई मोहीम, तसेच साफ पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर यांसारख्या सुविधा वेळोवेळी पुरवण्यात येतील, असे आश्वस्त केले.

सूचनांचे पालन करा : जीबीएस व्हायरस हा संसर्गजन्य नाही. परंतु, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे किंवा दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखणे, उकळलेले पाणी पिणे, स्वच्छ अन्नाचे सेवन करणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. जर जीबीएसची काही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आ. डॉ. भोसले यांनी केले.

तालुका आरोग्य प्रशासन दक्ष :  बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, जीबीएस संदर्भात तालुका आरोग्य विभागाला विविध उपयोजना करण्यासह स्वच्छता व जनजागृती करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सध्या कराड तालुक्यात जीबीएस सदृश्य लक्षणे असलेला एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे. सदर रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये, तसेच रुग्णांची कसलीही गैरसोय होऊ नये, याबाबत तालुका आरोग्य प्रशासनाने दक्षता बाळगत खबरदारी म्हणून तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर उघड्यावरील पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडे धारकांची तपासणी करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लहान मुले, वयस्क व आजारी नागरिकांनी आपल्या आरोग्याची खबरदारी घेवून लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

प्रभावी जनजागृती मोहीम राबवणार : जीबीएस आजराबाबत स्थानिक प्रशासन एक प्रभावी जनजागृती मोहीम राबवणार असून, नागरिकांना आवश्यक माहिती आणि मदत पुरवली जाईल. तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य मदत आणि उपाययोजना तात्काळ राबवित असल्याचेही आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

उपस्थिती : या बैठकीस स्थानिक आरोग्य यंत्रणा, पाणीपुरवठा विभाग, स्वच्छता विभाग आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!