कराड/प्रतिनिधी : –
कोळे गावाच्या विकासकामांसाठी लागेल तेवढी मदत करू. कोळे हे माझे गाव असून या गावाला एका विशिष्ट उंचीवर न्यायचे असून यामध्ये गावकऱ्यांनी हातभार लावत सहकार्य
केले पाहिजे, अशी अपेक्षा भारत फोर्जचे चेअरमन, पद्मभूषण बाबासाहेब निळकंठराव कल्याणी यांनी व्यक्त.
सदिच्छा भेट : भारत फोर्ज कंपनीचे चेअरमन पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांनी त्यांच्या कोळे (ता. कराड) या मुळ गावास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
हेलिकॉप्टरने गावात आगमन : बाबासाहेब कल्याणी हे पुण्याहून कुटुंबासह कोळे येथे रविवारी सकाळी 9.40 वाजता हेलिकॉप्टरने दाखल झाले. गावात बाबासाहेब व त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी दाखल होताच गावकऱ्यांच्यावतीने सरपंच लतीफा अमानुल्ला फकीर यांनी त्यांचे स्वागत केले. खूप वर्षांनी ते गावामध्ये येत असल्याने ग्रामपंचायत कोळे व ग्रामस्थांनी स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. गावात पथमच हेलिकॉप्टर येत असल्याने बाल चिमुकल्यांसह संपूर्ण गाव हेलीपॅड परिसरात दाखल झाला होता. ते गावामध्ये दाखल होताच संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.
जगप्रसिद्ध उद्योजक : बाबासाहेब कल्याणी यांच्या कंपनीने फोर्जिग क्षेत्रात विशेष ठसा उमटवत संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वदेशी रणगाडे, तोफा व इतर सामुग्री कंपनी पुरवते. 20 ते 25 देशात त्यांच्या भारत फोर्ज कंपनीचा विस्तार आहे. कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कोळे गावातील शाळा, पंढरपूर येथील घाडगेनाथ महाराजांचा मठ, गावातील बंदिस्त गटार, पाणी योजना, सोलर प्लांट, काँक्रीटचे रस्ते यांसह अत्यावश्यक लागणाऱ्या अनुषंगिक कामांनाही निधी दिला असून गावच्या विकासाला चालना देण्याचे काम बाबासाहेब कल्याणी यांनी केले आहे. या भेटीप्रसंगी विकासकामांची पाहणी करत असताना त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा (मुली) या शाळेला भेट देवून विद्यार्थिनींसोबत मनमोकळ्या गप्पा त्यांच्यासोबत फोटोही काढले. तसेच त्यांची आस्तेवाईकपने विचारपूस केली.
ग्रामस्थांचा हातभार हवा : यावेळी बोलताना बाबासाहेब कल्याणीसाहेब म्हणाले, आमच्या आजोबांनी आमच्या घराण्याची सुरुवात या गावापासून केली आहे. लहानपणापासून गरिबी होती. त्यांची लोकांवर श्रद्धा होती. आम्ही आज जे काही आहोत, ते त्यांच्या पुण्याईमुळेच. मला अभिमान वाटतो की, या गावात माझा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी आम्ही या गावात होतो. नंतर कराडला गेलो आणि तेथून पुण्याला रहायला गेलो. तरी कल्याणी परिवार या गावाचा आहे आणि सदैव राहील. त्यामुळे गावात ज्या ज्या सुधारणा करायला पाहिजेत, त्या आपण करायच्या आहेत. पण त्यात ग्रामस्थांचाही हातभार लागायला हवा. त्यांचे सहकार्य लाभल्यास कोळे गावाला आपण विशिष्ट उंचीवर नक्कीच घेऊन जाऊ, अशी ग्वाही दिली.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी कोळे ग्रामपंचायतीच्या वतीने आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोळे सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, सहकारी संस्था, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल व इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी व त्यांच्या पत्नी सुनीता कल्याणी (वहिनीसाहेब), राजू कल्याणी व त्यांच्या पत्नी, तसेच महेश कल्याणी व त्यांच्या पत्नी प्रतिभा कल्याणी आणि देवांक कल्याणी यांचा सत्कार करण्यात आला.
गावासाठी लागेल ती मदत करू
भारत फोर्ज कंपनीच्या सी.एस.आर फंडातून झालेल्या कामांची श्री कल्याणी यांनी पाहणी केली. सी.एस.आर फंडामधून आत्तापर्यंत गावासाठी कोट्यावधीचा निधी दिला असून या फंडातून आणखी लागेल ती मदत, लागेल ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही बाबासाहेब कल्याणी यांनी यावेळी सांगितले.
महादेवाचे घेतले दर्शन
बाबासाहेब कल्याणी यांच्या आजोबांनी 1994 साली बांधलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करून कुटुंबासह त्यांनी दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली.