मल्लिनाथ पाटील; क्लबच्या उपक्रमास भेट, निराधार बालक व एकल महिलांना धान्य कीट वितरण
कराड/प्रतिनिधी : –
लायन्स क्लबच्या माध्यमातून जगभरात विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात. त्यानुसार लायन्स क्लब कराड सिटीचे उत्कृष्ट कार्य सुरू असून क्लबने सात महिन्यात तब्बल 140 उपक्रम राबवले आहेत. क्लबचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत लायन्सचे प्रांतपाल, जिल्हाध्यक्ष अॅड. मल्लिनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
क्लबच्या उपक्रमास भेट : लायन्स क्लब कराड सिटीतर्फे निराधार बालके व एकल महिलांना धान्य कीट वाटप व अण्णाजी पवार विद्यालय, वहागाव येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या प्रमाणपत्र वितरण अशा संयुक्त कार्यक्रमास प्रांतपाल, जिल्हाध्यक्ष अॅड. मल्लिनाथ पाटील बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते धान्य कीट व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी क्लबच्या अध्यक्षा मंजिरी खुस्पे, सचिव शशिकांत पाटील, खजिनदार लक्ष्मण यादव, महेश खुस्पे आदींची उपस्थिती होती.
कॅन्सर तपासणी शिबिर : माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, एकूण पाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आमच्या लायन्स क्लबच्या मेगा युनिटतर्फे वर्षभरात महत्त्वपूर्ण ४ उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये रक्तदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आले आहेत. आगामी काळात लहान मुलांमधील कॅन्सर तपासणी शिबिरे मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत.
पीपीटीद्वारे सादरीकरण : गेल्या सात महिन्यात लायन्स क्लब कराड सिटीतर्फे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
उपक्रमांची माहिती : प्रास्ताविकात महेश खुस्पे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लायन्स क्लब कराड सिटीतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
विविध उपक्रम : मंजिरी खुस्पे यांनी क्लबच्या सदस्यांच्या वाढदिनी त्यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या निधीतून विविध ठिकाणी मदत पोहोचवली जात असल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भांडी वाटप, धान्य कीट वाटप, आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण, निराधार बालकांसाठी शालेय साहित्य वाटप, निराधार महिलांसाठी विविध स्वरूपांची मदत करण्यात आली असल्याचे सांगितले.
