अंकुश मोहिते; ब्रह्मदास विद्यालयात ‘जयंत करिअर सप्ताह साजरा
कराड/प्रतिनिधी : –
व्यवसायात यशस्वी होणे, हे प्रत्येक व्यावसायिकाचे ध्येय असते. या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु, प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्याशिवाय व्यवसायात यश मिळत नाही. खडतर परिश्रम हाच व्यवसायाचा राजमार्ग असतो, असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष, उद्योजक अंकुश मोहिते यांनी केले.
जयंत करिअर सप्ताह : कासेगाव शिक्षण संस्थेच्या बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ब्रह्मदास विद्यालयातील आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जयंत करिअर सप्ताहा’मध्ये आयोजित खाऊ गल्ली उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मारुती मोहिते, कार्याध्यक्ष जे. बी. माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. माने, आनंदराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यवसायाकडे करिअर म्हणून पहा : श्री मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवहार समजायला हवा. आर्थिक देवाण – घेवाण समजायला हवी. नोकरी म्हणजेच करिअर नव्हे; तर आपण व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टीने पाहू शकतो, हे ओळखून भविष्यात आपण स्वत: एखादा व्यवसाय सुरु करावा, अशी मनीषा बाळगावी, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
व्यवहारज्ञान समजण्यासाठी आयोजन : यावेळी मुख्याध्यापक एस. वाय. माने यांनी खाऊ गल्लीमुळे आपण दैनंदिन व्यवहार कार्यक्षमपणे करू शकतो. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपणास व्यवहार समजण्यासाठी या खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
नियोजन : खाऊ गल्ली उपक्रमाचे नियोजन जे. बी. माने, सुवर्णा जाधव, पी. टी. पाटील व जी. ए. मोरे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. टी. पाटील, एन. के. माळी, व्ही. पी. मोटे, एस. डी. वाबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
