उत्सवाचे नववे वर्ष; विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन
कराड/प्रतिनिधी : –
प. पु. योगी ब्रह्मदास महाराज व प. पु. योगी नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथे शनिवार (दि. 1) फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती उत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे.
नवसाला पावणारा गणपती : गेले 41 वर्ष नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध पावलेल्या ‘श्री सिद्धिविनायक’ गणेशाची 9 वर्षांपूर्वी बेलवडे बुद्रुकमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून गावात अत्यंत भक्तीभावाच्या वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
पारायण : यावर्षी या उत्सवाचे 9 वे वर्ष आहे. या उत्सवानिमित्त गुरुवार (दि. 30) जानेवारी ते शनिवार (दि. 1) फेब्रुवारी असे तीन दिवस ‘श्री गणेश पुराण’ या ग्रंथाचे पारायण होणार आहे. या पारायणाचे व्यासपीठ चालक ह. भ. प. आनंदराव मोहिते (बापू), हार्मोनियम वादक ह. भ. प. कुमारी वर्षा कुंभार व हनुमंत वाहगावकर, मृदुंगमणी ह. भ. प. शिवाजी शितोळे (आळंदी), अरुण कांबळे व दीपक मोहिते, चोपदार ह. भ. प. जयवंत वेदपाठक, किर्तनसाथ ह. भ. प. रघुनाथ देसाई, समीर शिंदे, सुधीर देसाई (काले), भूषण महाराज (धोंडेवाडी), तसेच प. पु. नारायण महाराज हरिपाठ मंडळ व ग्रामस्थ यांची असणार आहे.
उत्सवाचा प्रारंभ : या उत्सवाचा प्रारंभ गुरुवार (दि. 30) जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता श्रींच्या आरतीने व ह. भ. प. दिलीप महाराज कापूरकर (कासेगाव), तसेच पांडुरंग पाटील महाराज (कापूसखेड) दिनकर मोहिते, बाबुराव मोहिते, रामचंद्र कुंभार, संजय माळी, संजय जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ग्रंथपुजन, विना व पताका पूजन करून करण्यात येणार आहे.
जागर व भजन : या उत्सवकाळात गुरुवार (दि. 30) जानेवारी रोजी रात्री सद्गुरु श्री मुकुंद महाराज भजनी मंडळ (आटके), शुक्रवार (दि. 31) जानेवारी कालवडे भजनी मंडळ (कालवडे) व शनिवार (दि. 1) फेब्रुवारी रोजी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ बेलवडे बुद्रुक यांची जागर व भजन सेवा होणार आहे. तसेच शनिवार (दि. 1) फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आवाहन : या उत्सवात बेलवडे बुद्रुक, कालवडे, काले, मालखेड, कासारशिरंबे, कासेगाव (दगडे मळा) येथील सर्व सांप्रदायिक भजनी मंडळे व पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक नवचैतन्य युवक गणेश मंडळ, सर्व ग्रामस्थ, सर्व गणेश व नवरात्र उत्सव मंडळे, बेलवडे बुद्रुक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
