कराड अर्बन बँकेचा वर्धापनदिन उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बँकेस आणखी पाच शाखा सुरू करण्यास रिझर्व बँकेची परवानगी – डॉ. सुभाष एरम 

कराड/प्रतिनिधी : – 

येथील कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा बँकेच्या मुख्य कार्यलयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी, तसेच अर्बन बझार व स्व.डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.

सत्यनारायण पूजा : याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या सुविद्य पत्नी व बँकेच्या संचालक सौ. रश्मी एरम यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, बँकेचे महाव्यवस्थापक (ट्रेझरी) सलीम शेख यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहिर करण्यात आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

नवीन शाखांना आरबीआयची मंजुरी : डिजिटलायज्ड व सायबर सुरक्षेने परिपुर्ण असलेल्या कराड अर्बन बँकेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आणखी पाच नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.

5500 कोटींचा टप्पा पूर्ण : सभासद-खातेदारांसाठी बँकेने नुकतेच यु.पी.आय. व ‘सकल पे’ मोबाईल बँकींग सेवेचा शुभारंभ केला असून बँकेने डिसेंबर २०२४ अखेर ५५०० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये नवीन शाखांना परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता.

याठिकाणी नवीन शाखा होणार सुरू : कराड अर्बन बँकेच्या प्रस्तावास रिझर्व्ह बँकेने अवघ्या एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद देत हडपसर (जि. पुणे), चाकण (जि.पुणे), शिरवळ (जि. सातारा), इचलकरंजी (जि. कोल्हापूर) आणि नातेपुते (जि. सोलापूर) येथे शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे बँकेस व्यवसाय वाढीसाठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी दिली.

व्यवसायाचे उद्दिष्ट : बँकेने चालू वर्षाअखेरीस ५,६०० कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सर्व सेवकांच्या प्रयत्नाने ते पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करून यापुढील काळातही बँक अतिउच्च ग्राहकसेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!
03:03